आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षे काढली कचऱ्यात, उपचार घेऊन येईल निवाऱ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केसांचा गुंता, कपड्यांचे भान नाही, कचऱ्यातून काहीतरी शोधून खायचे, कुठलेही पाणी प्यायचे अशा अवस्थेत जगणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला पोलिस आणि सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागात राहणाऱ्या एका सजग महिलेमुळे या मनोरुग्ण महिलेच्या पुुनर्वसनाचे प्रयत्न सुरू झालेत. सध्या तिच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू असून उपचारानंतर तिला मनपाच्या रात्रनिवारागृहात दाखल केले जाणार आहे. 

या महिलेच्या सांगण्यावरून तिचे नाव हलिमाबी आहे. तिचे गाव कोणते, नातेवाईक काय करतात, याबद्दल तिला कुठलीही माहिती सांगता येत नाही. आठ वर्षांपासून ती भाजीवाली बाईच्या पुतळ्याशेजारी रस्त्यावरच राहत होती. कुणी जाणारे-येणारे तिला कधीतरी खायला द्यायचे. जेव्हा काहीच समाेर नसेल, तेव्हा सरळ कचऱ्यातून काहीतरी शोधून ती खायची. 

शहरातील मनोरुग्ण आणि भिकाऱ्यांच्या प्रश्नावर डीबी स्टारने वारंवार वृत्त प्रकाशित करून या महत्त्वाच्या समस्येला वाचा फोडली आहे. त्यानंतर जीवनजागृती सामाजिक, वैद्यकीय संस्थेने अशा व्यक्तींसाठी पुढाकार घेतला होता. उस्मानपुरा येथे राहणाऱ्या अर्चना देवधर या सजग महिलेने संबंधित मनोरुग्ण महिलेबद्दल जीवनजागृती संस्थेला माहिती दिल्यानंतर संस्थेने त्याची दखल घेऊन या महिलेच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले. 

विधीसेवा प्राधिकरणाकडून पुनर्वसनासाठी घेतले आदेश 
यामहिलेबद्दल माहिती मिळाल्यानंतर संस्थेचे डॉ. फारूख पटेल, डॉ. सुनील पगडे यांनी त्या महिलेची भेट घेऊन तिच्या आजाराबद्दल प्राथमिक निष्कर्ष काढले. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मेंटल हेल्थ अॅक्टनुसार तिच्या पुनर्वसनासाठी अर्ज दाखल केला. प्राधिकरणाने उस्मानपुरा पोलिसांना या महिलेचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. शनिवार, २७ मे रोजी सकाळी डॉ. पगडे, डॉ. पटेल यांच्या मदतीने उस्मानपुरा पोलिसांनी सदर महिलेला घाटी रुग्णालयाच्या मनोविकार विभागात दाखल केले. 

उपचारानंतर महिलेला निवारागृहात पाठवणार 
या महिलेचे नातेवाईक सापडत नाहीत. तिला स्वत:चा पत्तादेखील सांगता येत नसल्याने उपचारानंतर तिला मनपाच्या रात्रनिवारागृहात ठेवले जाणार आहे. जर उपचारानंतर तिला तिचा पत्ता किंवा अन्य माहिती आठवली तर तिच्या घरी सोडण्यात येईल.
- डॉ.फारूख पटेल, जीवन जागृती सामाजिक, वैद्यकीय संस्था 
बातम्या आणखी आहेत...