आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत नातेवाइकांनी टँकर मागवल्यावरच शवविच्छेदन, नातेवाईक 6 तास ताटकळत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घाटीतील शवविच्छेदनगृहात मृतदेह धुण्यासाठी पाणी नसल्याने तो ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांना मंगळवारी सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. सोमवारी (१६ ऑक्टोबर) सायंकाळी सिडको बसस्थानकाजवळ झालेल्या अपघातातील मृत बालाजी ढवारे (४२, रा. पिसादेवी रोड) यांचा मृतदेह या ठिकाणी होता. शेवटी नातेवाइकांनीच पाण्याचे टँकर मागवल्यानंतर मृतदेह स्वच्छ करून ताब्यात देण्यात आला. 
 
शवविच्छेदनगृहात सोमवारी रात्री पाणी संपले. याची माहिती कर्मचाऱ्यांनी अधीक्षक कार्यालयाला दिली तेव्हा सकाळी सहा वाजता टँकर येईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजले तरी टँकर आले नाही. शेवटी नातेवाइकांनीच खासगी टँकर मागवले. त्यांनीच टाकीत पाणी चढवले. त्यानंतर एक वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ढवारेंसह आणखी चार मृतदेहांचे शवविच्छेदन रखडले होते. पाणी आल्यानंतर त्यांचेही शवविच्छेदन करण्यात आले. याबद्दल नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
 
नातेवाइकांची गर्दी : याविभागात दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, जलवाहिनीतील बिघाडामुळे रुग्णालयाला पाणीपुरवठा झाला नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सकाळपासून केवळ दोन मृतदेहांचे शवविच्छेदन झाले. रुग्णालय प्रशासनाने पाण्याचा टँकर मागवले होते. पाणी उपलब्ध झाल्यानंतरच हे शवविच्छेदन होणार असल्याने नातेवाइकांना अनेक तास थांबावे लागले. 
 
दोन्ही टाक्यांत मुबलक पाणी : घाटीच्यादोन्ही टाक्यांमध्ये पाणीसाठा मुबलक असून पाण्याची कमतरता नाही. शिवाय कुठेही गळती नाही, असे घाटीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद यांनी सांगितले. याविषयी शवविच्छेदन विभागाने कल्पना दिली नाही. सोमवारी येथील आढावा घेतला तेव्हाही पाण्याची कमतरता नाही म्हणून मागवलेले टँकर परत पाठवले. तात्पुरती टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
तत्काळ माहिती द्या 
विभागात पाणी संपण्याआधीच अंदाज घेऊन अधीक्षक कार्यालयाला कळवावे, अशा सूचना मी शवविच्छेदनगृहातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. व्यक्तीच्या निधनानंतर नातेवाईक दु:खात असतात, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. यानंतर असा प्रकार घडणार नाही. 
- डॉ. भारत सोनवणे, अधीक्षक, घाटी. 
 
बातम्या आणखी आहेत...