आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Released Water, If Not Then Bhadardara Door Opened

पाणी सोडा, नाही तर ‘भंडारदरा’ची दारे उघडू; शेतकरी आंदोलनाच्‍या पावित्र्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - जायकवाडीत वरील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय आठ दिवसांत घ्या, अन्यथा येत्या सोमवारी भंडारदरा धरणाचे गेट उघडून हक्काचे पाणी आम्ही घेऊ, अशी भूमिका आंदोलक शेतक-यांनी घेतली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत निर्णय घ्यावा, नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. पुढील आंदोलन धरणावर करण्याचा इशाराही देण्यात आला.


झुंजे मंगल कार्यालयात रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. यात माजी आमदार संदिपान भुमरे, जयाजी सूर्यवंशी, अप्पासाहेब निर्मळ, सुनील बलदवा उपस्थित होते. या वेळी जायकवाडीसाठी वरील धरणांतून पाणी कसे मिळेल यावर चर्चा करण्यात आली. प. महाराष्ट्रातील गब्बर मंत्र्यांपुढे मराठवाड्यातील आमदार हतबल आहेत. आमदार पाण्यावर काहीच बोलत नाहीत. लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने आंदोलनाशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे मत भुमरे यांनी व्यक्त केले. तर जायकवाडी धरण भरल्याशिवाय वरील धरणांनी पाणी अडवू नये, अशी मागणी सूर्यवंशी यांनी या वेळी केली.


साठा 20 टक्के होईपर्यंत उद्योगांना पाणी नाहीच
जायकवाडीत 20 टक्के पाणीसाठा जमा होईपर्यंत औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील उद्योगांची पाणीकपात कायम राहणार असल्याचे एमआयडीसी व पाटबंधारे अधिका-यांनी म्हटले आहे. दोन्ही जिल्ह्यांतील तीन हजार उद्योगांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. डिसेंबरमध्ये धरणात 1 टक्का पाणी होते. त्याआधी नोव्हेंबरमध्ये पाणीकपात सुरू झाली. ही 33 टक्के कपात साठा वाढेपर्यंत कायम ठेवावी लागणार असल्याचे दिसते, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए.एस.जाधव यांनी म्हटले आहे.


या कंपन्यांना फटका
०बजाज ०गरवारे ०व्हिडिओकॉन ०इंजिनिअरिंग ०फार्मा ०केमिकल ०कागद उत्पादक कंपन्या.
उत्पादनावर परिणाम : 33 टक्के पाणीकपातीमुळे उत्पादन घटले. सध्या पाऊस असल्याने कपात बंद करावी, अशी मागणी उद्योजक कपिल लोढा यांनी केली आहे.


पाणीसाठा दीड टक्का
आठ दिवसांपासून ओघ सुरू असल्याने जायकवाडीचा पाणीसाठा दीड टक्क्यावर आला आहे. 24 तासात 25.32 दलघमी आवक झाली. मृतसाठा भरून निघण्यासाठी यंदा दीड महिन्यावर काळ लागला. सध्या जिवंत साठा 31.38 दलघमी आहे. जूनपासून 198 दलघमी पाणी आले. सध्या 769 दलघमी पाणीसाठा आहे.


वरच्या धरणांचा साठा
गंगापूर 78%
पालखेड 75%
वाघाड 70%
भावली 99%
भंडारदरा 74%
दारणा 73%
नांदूर-मधमेश्वर बंधारा 70%