औरंगाबाद : जात ही काल्पनिक, आभासी आणि मानसिक आहे. जातिव्यवस्थेवर वर्णव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेवर धर्मव्यवस्था स्थापित आहे. यामुळे समाजातून जातीचा अंत करायचा असेल तर धर्मव्यवस्था नाकारणे गरजेचे आहे. जोपर्यंत समाज धर्मव्यवस्था नाकारत नाही तोपर्यंत समाजात जातिव्यवस्थेचे वर्चस्व कायम राहील, असे प्रतिपादन विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आज तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ‘भीमायन’ या कार्यक्रमात ते ‘आता मोर्चा जातिअंतासाठी’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे, प्रा. सूर्यकांता गाडे, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, नलिनी चोपडे, इंजिनिअर मिलिंद पाटील, शाहीर संभाजी भगत, शेकापचे नेते विकास शिंदे, विचारवंत डॉ. प्रतिभा अहिरे, सिटूचे अध्यक्ष उद्धव भवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत कोकाटे म्हणाले, सध्या सर्वत्र विविध जाती, धर्माचे मोर्चे निघत आहेत. या सर्वच मोर्चाच्या माध्यमातून होत असलेली आरक्षणाची मागणी रास्त आहे. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी मिळावी यासाठी आरक्षण महत्त्वाचे असल्याचे कोकाटे म्हणाले. मोर्चाचा हाच धागा पुढे नेत विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. प्रतिभा अहिरे यांनी मोर्चातील महिलांच्या सहभागावर टीका केली. मोर्चांमध्ये महिलांवर दाखवण्यात आलेला विश्वास हा आभासी असून त्यांचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हातात आहे. जातिप्रथा नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहाने भागणार नाही.
केवळ यामुळे जातीचा अंत होणार नाही. कारण जात अपरिवर्तनीय आहे. जातीचा अंत करण्यासाठी जातीचे ओझे झुगारून देणे आवश्यक असल्याचे डॉ.अहिरे म्हणाल्या. देशाच्या प्रगतीसाठी जातिव्यवस्था नष्ट होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, जातिव्यवस्थेची पाळेमुळे समाजात खोलवर रुतली असल्याने ती काढणे कठीण आहे. समाजात परिवर्तन होत असून तरुण पिढी ही भविष्याची नांदी असल्याचे त्या म्हणाल्या. आनंदराज आंबेडकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रारंभी विद्रोही कवी संभाजी भगत यांच्या ‘हिटलर के साथी’ या विद्रोही कवितेने कार्यक्रमात जोश आणला. यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
या वेळी पत्रकार स.सो. खंडाळकर, परमेश्वर साळवे अनिल जमधडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. प्रमोद दुधडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सेवा या पुरस्काराने गौरवण्यात आले. आदेश आटोटे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रबुद्ध समाजसेवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. शेवटी ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.
तथागतांची आकर्षक प्रतिमा
तापडिया नाट्यमंदिराबाहेर तथागत गौतम बुद्धांची पांढऱ्या रंगातील प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. यावर निळा प्रकाश टाकल्याने ती अधिकच आकर्षक वाटत होती. अनेक उपासकांनी प्रतिमेचे दर्शन घेतले. प्रतिमेसमोर सेल्फी काढण्यासाठी तरुण गर्दी करत होते.
पुढील स्लाईडवर कार्यक्रमाचे फोटो पाहा....