आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 नोव्हेंबरपर्यंत हटवणार ब वर्गातील धार्मिक स्थळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अनधिकृत धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाबाबत नव्याने एक हजारावर आक्षेप आलेले आहेत. सुनावणीला जास्त कालावधी लागणार असल्याने ऑक्टोबरपर्यंत आक्षेपांवर सुनावणी घेणे, त्यानंतर २४ ऑक्टोबरला अ, वर्ग धार्मिक स्थळांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि त्यानंतर ब वर्गातील अतिक्रमित धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबरपर्यंत हटवणे, असा नवा आराखडा (कॅलेंडर ऑफ ऑपरेशन) धार्मिक स्थळ नियमितीकरण समितीने सोमवारी तयार केला. 

या समितीची बैठक समिती अध्यक्ष तथा मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झाली. बैठकीस जिल्हाधिकारी एन. के. राम, पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह सर्व १३ विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जुन्या आराखड्यावर चर्चा झाली. त्यात जिल्हाधिकारी पोलिस आयुक्तांनी सुधारणा सुचवल्या. अन्य सदस्यांच्या सूचनांचा विचार करून २३ ऑगस्टला न्यायालयात नवा आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे मुगळीकर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक, खासगी जागांवरील, विविध प्राधिकरणांच्या जागांवर असलेल्या धार्मिक स्थळांवर चर्चा झाली. हा आराखडा म्हणजेच नव्याने तयार केलेली कारवाईची रूपरेषा असून, शपथ पत्राद्वारे न्यायालयात सादर करण्यात येईल. 

नव्याने ११०७ आक्षेप
मनपाने१० ते १८ ऑगस्ट या कालावधीत धार्मिक स्थळांबाबत आक्षेप मागवले होते. या वेळी ११०७ आक्षेप प्राप्त झाले. यापूर्वीच ८०३ आक्षेप आले आहेत. एकूण १९१० आक्षेपांचा निपटारा करायचा आहे. आयुक्तांनी पथके यासाठी नियुक्त केली आहेत. त्यात पालिकेचे अधिकारी, पोलिस दलातील अधिकारी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते आक्षेपांची छाननी करतील, कागदपत्रांची पासणी करतील, त्यानंतर स्थळ पाहणी करून धार्मिक स्थळांचा वर्ग ठरवला जाईल. 

कोर्टाच्या दट्ट्यानंतर कलेक्टर, सीपी हजर 
पूर्वीच्याबैठकीस पोलिस आयुक्त यशस्वी यादव जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दांडी मारत दुय्यम अधिकाऱ्यांना पाठवले. शहरातील महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्याने दोघांनीही न्यायालयासमोर माफी मागितली होती. त्यानंतर दोघांनीही या बैठकीस हजर राहावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार ते बैठकीस हजर राहिले. 
बातम्या आणखी आहेत...