आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Religious Teacher Beaten Up In Aurangabad, Stone Pelting In Two Groups

औरंगाबादेत धार्मिक शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन गटांत तुफान दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एका प्रार्थनास्थळातून परतणा-या धार्मिक शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ करत चार जणांच्या टोळक्याने शनिवारी रात्री साडेआठ वाजता मारहाण केली. यावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. दुकाने, वाहनांचेही नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे बेगमपुरा भागात काही काळ तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते.
पहाडसिंगपुरा येथील धार्मिक शिक्षकाला टोळक्याने शिवीगाळ केली. यावर त्यांनी जाब विचारला. तेव्हा टोळक्याने त्यांच्यासह मध्यस्थी करणा-या टोस्ट विक्रेत्याला मारहाण केली. घटना कळताच परिसरातील दुस-या गटातील तरुण तेथे आले. त्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. काही वेळेतच दगडफेक सुरू झाली. मकाई गेटजवळील तारकस गल्लीच्या दिशेने एक जमाव गेला. यातील काहींनी अ‍ॅड. संजय डोंगरे यांच्या घराचा दरवाजा तोडला. विलास भागवत ढेपले यांचे श्री साईप्रेम मेडिकल आणि डॉ. विजय साळुंके यांच्या श्री क्लिनिकचीही जमावाने तोडफोड केली.
दुकानांसमोरील आठ दुचाकीही उलथवून टाकल्या. मेडिकलच्या गल्ल्यातून नऊ ते साडेनऊ हजार रुपये पळवल्याचाही आरोप होत आहे. पुढे जात जमावाने चार रिक्षाही उलथवून टाकल्या. घाटी रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयातील निवृत्त डॉ. श्रीकृष्ण देवराव पाथरीकर यांच्या टाटा सुमोच्या (एमएच-20-एए-4362) काचाही जमावाने फोडल्या. काही जणांच्या टोळक्याने विजेच्या डीपीवर दगडफेक केली. त्यामुळे स्पार्किंग होऊन परिसरात काळोख पसरला होता.
घटना कळताच पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव, निरीक्षक बालाजी सोनटक्के, श्रीपाद परोपकारी, अशोक कदम यांच्यासह पोलिस घटनास्थळी आले. जखमी धार्मिक शिक्षकाला घाटीत दाखल करण्यात आले. यावेळी घाटीच्या अपघात विभागासमोरही जमाव जमला होता. बेगमपुरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.