आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हैसमाळमध्ये डोंगराळ भागात अाढळले मानवी मृतदेहाचे अवशेष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या म्हैसमाळ येथील गिरजादेवीच्या मंदिरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात मानवी मृतदेहाचे अवशेष मंगळवारी आढळून आले. माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.   

घटनास्थळी कवटी, हातापायाचा सांगाडा, एका मुस्लिम व्यक्तीचे नाव असलेले आधार कार्ड, पँट, टीशर्ट व चपला आढळून आल्या.  या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून  हे प्रकरण उलगडण्याचे मोठे आव्हान आता खुलताबाद पोलिसांसमोर उभे ठाकले अाहे.खुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार, म्हैसमाळ येथील पोलिस पाटील संजय जाधव यांनी म्हैसमाळ गिरजादेवीच्या मंदिरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या डोंगरात मानवी मृतदेहाचे अवशेष पडलेले असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास म्हैसमाळ डोंगरात पोहाेचले. म्हैसमाळ ते चिंचोली डोंगरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात व डोंगराच्या वरच्या कडेला मानवी कवटी, हातपायांच्या हाडांचे सांगाडे, जीन्स पँट, टीशर्ट, चपला यासह एका व्यक्तीच्या नावाचे आधार कार्ड व कुजलेल्या अवस्थेत काही कागदपत्रे आढळून आली. घटनास्थळावर सापडलेल्या आधार कार्डवर नाशिक जिल्ह्यातील सायगाव येथील व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
 
अवशेष चाचणीसाठी प्रयोगशाळेत : खुलताबाद पोलिसांनी  मानवी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेऊन औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत डीएनए तपासणीसाठी पाठवले आहे. तपासणीनंतरच खून की आत्महत्या याचा उलगडा होणार आहे. २० ते २५ दिवसांपूर्वीची ही घटना असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...