जालना - गळा दाबून खून झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील देवनगर येथे १९ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी मृताचा मुलगा नारायण झुटे यांनी गावातील दोन संशयितांनी खून केल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिस तपासात त्र्यंबक झुटे हे नात्यातील महिलांची छेड काढत होते म्हणून मी व चुलत भावाने वडिलाचा खून केला असल्याची कबुली फिर्यादीने दिल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण होते. परंतु या दिवशीच देवनगर शिवारात खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. वडिलाचा गावातील दोघांनी खून केल्याची तक्रार घनसावंगी पोलिस ठाण्यात नारायण झुटे यांनी दिली होती.
दरम्यान, नारायण याने २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज करून वडिलाच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची नावे मी दिली नसून पोलिसांनी माझी फक्त स्वाक्षरी घेऊन गुन्हा नोंदविला, आरोपींबाबत माझी तक्रार नसल्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
या सर्व घटनेवरून सहायक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवून महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली. तेथील माहितीच्या आधारावरून फिर्यादी आरोपी नारायण झुटे यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने त्याचा चुलत भाऊ रामेश्वर नामदेव झुटे या दोघांनी महिनाभरापूर्वीच त्र्यंबक झुटे यांचा खून करण्याचे नियोजन केले होते.
त्याप्रमाणे नियोजित कटानुसार १९ फेब्रुवारी रोजी खून केल्याची कबुली दिली. तसेच रामेश्वर यांच्या सांगण्यावरून गावातील दोन व्यक्तींवर संशय घेऊन त्यांना गुन्ह्यात गोवले असल्याची त्याने कबुली दिली आहे.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, संजय लोहकरे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, फुलचंद हजारे आदींनी कारवाई केली.
वेगळे वळण मिळण्याची शक्यता
फिर्यादीकडून तक्रार, पुन्हा गुन्ह्याची कबुली यामुळे पोलिसांनाही तपासात अनेक अडचणी आल्या. आता खून केल्याची कबुली देऊन मुलाने चुलत भावानेच संशयितांची नावे सांगण्यास भाग पाडले होते, असा कबुलीजबाब दिल्यामुळे या प्रकरणाला अजून वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.