आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कार्यालयासाठी सरकारी जागा देऊ, उद्घाटना प्रसंगी बागडे यांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बहुतांश सरकारी कार्यालये ही भाडेतत्त्वाने घेतलेल्या जागेत आहेत. सरकारी जमिनी मोठ्या प्रमाणात तशाच पडून असताना भाड्याच्या जागेवर कार्यालये का उघडली जातात, हे कळत नाही. सरकारी कार्यालये सरकारी जागेतच बांधण्यासाठी मदत करू, असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले.
रविवारी, २५ जानेवारी रोजी हर्सूल येथील पोलिस ठाण्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष बागडे म्हणाले, आज हर्सूल पोलिस ठाण्याचे उद्घाटन झाले ती जागा खासगी आहे. प्रशासनाने प्रयत्न केला असता तर त्यांना सरकारी जागा मिळाली असती. गावात येतानाच पशुसंवर्धन विभागाची मोठी जागा आहे. त्यातील बहुतांश जागा पडीत आहे. शासनाकडे शिफारस केली असती तर जागा मिळाली असती. बांधकामासाठी खासदार आणि आमदारांनी प्रयत्न केले असते, तर येथे इमारत उभी राहिली असती. या बाबींचा विचार गांभीर्यपूवर्क होणे आवश्यक असल्याचे बागडे यांनी सांगितले. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार इम्तियाज जलील, संजय शिरसाट, महापौर कला ओझा, पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह, उपायुक्त वसंत परदेशी, अरविंद चावरिया यांच्यासह पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती.
नव्या पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून एल. ए. शिनगारे यांना जबाबदारी देण्यात आली अाहे. यापूर्वी त्यांनी मुंबई, हिंगोली आदी जिल्ह्यांत काम केले आहे. एक सहायक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षकांसह ३८ कर्मचाऱ्यांची या ठाण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत, हर्सूल गाव, शिवारात मयूर पार्क, संभाजी कॉलनी, जाधववाडी, सुरेवाडी, हरिसिद्धीनगर, रहापट्टी तांडा, धोपटेश्वर, जोगवाडी, चिमणपूरवाडी, कृष्णापूरवाडी, पुनतांडा, अमरावती तांडा, इस्लामपुरी वाडी अशा १२ ताड्यांचा सहभाग आहे. याशिवाय जटवाडा आणि सावंगीदेखील या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत यावे, अशी विनंती पोलिस आयुक्तांना नागरिकांच्या वतीने बागडे यांनी केली.

या वेळी महापौर कला ओझा म्हणाल्या, राजकीय नेते नागरिकांच्या समस्या घेऊन पोलिसांकडे येतात. मात्र पोलिस त्यांच्यावर लाठीचार्ज करतात. मागील वर्षी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शिवसैनिकांच्या नगरसेवकांवर आणि पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे सांगितले. खासदार खैरे यांनीदेखील या प्रकरणाचा भाषणात उल्लेख करत म्हणाले, मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही गेलो, तर आमची समजूत काढण्यात आली. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला नाही. मात्र, पोलिसांनी हळूच आमच्यावर गुन्हा दाखल केला, असे असल्यावर पोलिसांवर विश्वास ठेवावा कसा, असा सवाल खासदार खैरे यांनी केला. याला उत्तर देत बागडे म्हणाले, पोलिसांना मारू द्या, मारले नाही तर त्यांचा धाक राहील कसा? कायद्याचे रक्षण करताना "सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या आपल्या ब्रीदवाक्याचे भान पोलिसांनी ठेवावे, असे आवाहन बागडे यांनी केले.
शहरात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या चरस, गांजा आणि दारूची विक्री होती. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. सामान्य नागरिक यांच्या तक्रारी आमदाराकडे करतात. त्या तक्रारी पोलिसांकडे करायला हव्यात. पोलिसांनी नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यास त्यांना नागरिक सहज माहिती देतील, असे मत आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले, तर खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीशिवाय मोठ्या प्रमाणावर भूखंडाच्या तक्रारी आहेत. यावरही पोलिसांना काम करावे लागेल.