आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गोल्डी’ कात टाकतेय...!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- १५ वर्षांपूर्वी सिंगल स्क्रीनच्या जमान्यात रेल्वेस्टेशनजवळील ‘गोल्डी’ सिनेमागृह म्हणजे उत्सुकतेचा विषय. मऊ कुशन असलेल्या खुर्च्या, पाय ठेवले की लागणारे लाइट, एसी, डॉल्बी डिजिटल साउंड, उत्तम कँटीन आणि पार्किंगसाठी भरपूर जागा या सगळ्या गोष्टी इतर थिएटरपेक्षा वेगळ्या ठरत होत्या. मल्टिप्लेक्स झाल्यानंतर प्रेक्षक तिकडे वळला आणि गोल्डी मराठी सिनेमांपुरती मर्यादित राहिली. मात्र, आता कात टाकून गोल्डी नवीन स्वरूपात प्रेक्षकांसाठी येते आहे.
२००० मध्ये दीपक जव्हारानी यांनी गोल्डीच्या रूपाने सर्व सोयींनी युक्त चित्रपटगृह सुरू केले. ‘हम साथ साथ हैं’ हा पहिला सिनेमा या चित्रपटगृहात लागला आणि प्रेक्षक सिनेमाबरोबर गोल्डीच्या प्रेमात पडले. कॉलेज बुडवून येणाऱ्या तरुण मंडळींपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या आठवणी या सिनेमागृहासोबत जोडल्या गेल्या आहेत. बाल्कनी आणि फर्स्ट क्लासमध्ये बसणाऱ्या दोन्ही वर्गांच्या प्रेक्षकांनी या सिनेमागृहात सिनेमाचा मनसोक्त आनंद घेतला. गेल्या १५ वर्षांत गोल्डीत ७२० सिनेमे लागले. "बॉर्डर'पासून "दुनियादारी'पर्यंत प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. दोन महिन्यांपूर्वी ‘जस्ट गंमत’ आणि ‘बरखा’ हे गोल्डीत लागलेले शेवटचे सिनेमे होते.
मोठ्या पडद्यावर मॅच
औरंगाबादच्या क्रिकेटप्रेमींसाठी गोल्डीनेच सर्वप्रथम मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे (वर्ल्डकप) प्रक्षेपण केले. सध्या या चित्रपटगृहाचे नूतनीकरण सुरू आहे. आणखी अद्ययावत ते स्क्रीन आणि शॉपिंग प्लाझा याप्रमाणे नवीन स्वरूपात गोल्डीची उभारणी करण्याचा प्रयत्न दीपक जव्हारानी आणि त्यांची टीम करत आहे.
सेलिब्रिटींच्या भेटी
७२४ आसनक्षमता असलेल्या या चित्रपटगृहाला आजपर्यंत श्रीदेवी, अनिल कपूर, महिमा चौधरी, जॅकी श्रॉफ या सेलिब्रिटींनी भेट दिली. पाच लाखांपेक्षा जास्त अशी ‘डॉल्बी डिजिटल’ संगीत व्यवस्था ‘क्रिस्टी प्रोजेक्टर’ची व्यवस्था असलेले गोल्डी हे मराठवाड्यातील पहिले चित्रपटगृह होते.
वैशिष्ट्यपूर्ण गोल्डी
- भरपूर गर्दी, अत्याधुनिक साउंड सिस्टिम, कमी पैशांमध्ये एसी सुविधा ही गोल्डीची वैशिष्ट्ये आहेत. एकापेक्षा एक सरस चित्रपट या चित्रपटगृहाने दाखवले.
अशोक उजळंबकर, चित्रपट क्षेत्राचे अभ्यासक
सिंगल स्क्रीन धोक्यात
- मल्टिप्लेक्समुळे सिंगल स्क्रीन धोक्यात आल्या आहेत. २००० ते २००७ पर्यंत गोल्डी शहरातील एक नंबरचे चित्रपटगृह होते.
शैलेंद्र वर्मा, मॅनेजर, गोल्डी चित्रपटगृह