आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ बैठकीसाठी 'सुभेदारी'चे नूतनीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मंत्रिमंडळ बैठकीसाठी सुभेदारी विश्रामगृहाचे काम हाती घेण्यात आले आहे. नव्याने रुजू झालेल्या कार्यकारी अभियंत्यांनी विश्रामगृहांच्या कक्षासाठी ६० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली असून १५ तारखेपासून २५ कक्षांच्या नूतनीकरणाचे काम सुरू होणार आहे. २००७-०८ नंतर पहिल्यांदाच बैठक होत असल्याने सर्वच विभागांचे अधिकारी कामाला लागले आहेत.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत आले असता त्या वेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे जाहीर केले होते. बैठकीची पूर्वतयारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी सुभेदारी विश्रामगृहातील कामाचा आढावा घेतला. विश्रामगृहाचे खासगीकरण होणार असल्याने विभागाच्या वतीने मागील सहा वर्षांपासून एकाही विशेष कामास मंजुरी दिली नव्हती. परिणामी विश्रामगृहाच्या कक्षांची दुरवस्था झाली आहे.
२४ कक्षांचे नूतनीकरण...
निझामकालीन सुभेदारीच्या मुख्य इमारतीत व्हीव्हीआयपींसाठी कक्ष आहेत. हे कक्ष कमी पडत असल्याने व्हीआयपींसाठी अजिंठा- १२, अॅनेक्स - ४, वेरूळ- २४ कक्ष बांधण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या सर्व कक्षांचे नूतनीकरण फर्निचरचे काम सतत केले जात होते. मात्र, मागील आठ वर्षांपासून एकही बैठक झाल्याने कामे बंद आहेत. वेरूळ इमारतीत २४ कक्ष असून येत्या १५ जुलैपासून आरक्षण बंद राहणार आहे. हे काम महिन्यात पूर्ण करून पुढील २० दिवसांत सर्वच कक्षांतील फर्निचर, विद्युतीकरण इतर कामे केली जाणार आहेत. व्हीआयपीसाठी असलेल्या अजिंठा इमारतीतील दोन कक्षांचे काम सुरू केले आहे.
खान साम्यांना इशारा...
तीन इमारतींसाठी वेगवेगळे खानसामे (आचारी) असून भोजन कक्षाची दुरवस्था झाली आहे. या तिन्ही खानसाम्यांना जेवणाबरोबर स्वच्छता ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. बैठकीपूर्वी सर्वांनी त्यांच्या कक्षात असलेल्या साहित्य फर्निचरच्या दुरुस्तीसाठी विशेष लक्ष ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बैठकीसाठी काम सुरू
- सप्टेंबरमध्ये होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणाऱ्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची व्यवस्था योग्य प्रकारे राहावी यासाठी कक्षांचे काम सुरू केलेले आहे. बैठकीपूर्वी सर्वच कक्षांतील सर्वच कामे करण्याचा प्रयत्न आहे.
पी. आय. सुखदेवे, कार्यकारी अभियंता.