आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरा औरंगाबाद' नृत्य शृंखलेत गौरीरमणा प्रस्तुतीतून भगवान शिवस्तुती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रख्यात नृत्यांगना गुरू स्व. रोहिणी भाटे यांच्या शिष्या प्राजक्ता राज यांच्या चपळाईपूर्ण आणि अदाकारीने नटलेल्या नृत्य सादरीकरणाने रसिकांना मोहित केले. "औरा औरंगाबाद' नृत्यशृंखलेचा दुसरा दिवस कथ्थक प्रस्तुतीने संस्मरणीय झाला. रामजन्माचे मनोहारी सादरीकरण, गौररमण भगवान शंकर तसेच श्रीकृष्ण जीवनातील होळीचा प्रसंग नृत्यातून उभा करण्यात आला. महागामी गुरुकुलाच्या सारंगदेव सभागृहात शनिवारी सोहळा रंगला. कथ्थकच्या परंपरेप्रमाणे त्रिदेव स्तुतीने शिव, दुर्गा आणि कृष्णाला वंदन करत सादरीकरणाला सुरुवात झाली. कथ्थक नृत्यातील तंत्रशुद्ध प्रकाराचे दर्शन घडवणाऱ्या तीनतालाचे सादरीकरण नृत्यांगनेचे कौशल्य दाखवणारे होते. यांनतर दक्षयज्ञ ही अंगावर शहारे आणणारी प्रस्तुती झाली. पतीचा वडिलांकडून अवमान झाल्यानंतर स्वत:ला यज्ञात झोकून देणाऱ्या देवी सतीची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली. चैती या प्रस्तुतीत राम जन्मसोहळा दाखवण्यात आला. संत तुलसीदास रचित या रचनेने अतिशय भावपूर्ण वातावरण निर्मिती केली.
गौरीरमणा प्रस्तुतीतून भगवान शंकराचे सामर्थ्य दाखवण्यात आले. युगुल कीर्तन ही वैशिष्ट्यपूर्ण रचना या वेळी सादर करण्यात आली. ताल अदाकारीचे अतिशय समन्वयपूर्ण सादरीकरण रसिकांची दाद मिळवून गेले. राग हंसध्वनीमध्ये निबद्ध आणि ताल झपतालात बांधण्यात आलेला तराणा अतिशय ताकदीने सादर करण्यात आला. होळी नृत्यातून राधा गोपिकांसह कृष्णाची रंगलेली रासलीला वृंदावनातील प्रसंग उभे करणारी होती. समूह कीर्तनात नृत्यांगनेचे नृत्य सादरीकरण डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. या वेळी महागामी संचालिका पार्वती दत्ता, सीआयआयचे पदाधिकारी, पर्यटक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महागामीची प्रस्तुती
महागामीच्या शिष्या कथ्थकचे सादरीकरण करून "औरा औरंगाबाद' नृत्यशृंखलेचा तिसरा दिवस पर्यटकांसाठी विशेष बनवणार आहेत. हा कार्यक्रम विनाशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.