आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणूचे दोन्ही बछडे दाेन दिवसांमध्येच दगावले, गुणसूत्रातील दोष शोधण्यासाठी नमुने पाठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील रेणू या बिबट्याच्या मादीने दोनच दिवसांपूर्वी जन्म दिलेल्या दोन्ही बछड्यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. फेब्रुवारीत रेणूच्याच तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. रेणू राजाची मेडिकल हिस्ट्री मागवल्यानंतर रेणूचे बछडे दगावण्याची ही चौथी वेळ असल्याचे समोर आले असून आता राजा रेणू यांच्या गुणसूत्रांत काही दोष आहेत का, याची तपासणी करण्यासाठी मृत बछड्यांच्या शरीराचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात हेमलकसा येथून प्रकाश आमटे यांच्या प्राणिसंग्रहालयातून औरंगाबादेत राजा रेणू ही बिबट्यांची जोडी आणली होती. तेव्हा रेणू गरोदर होती हे लक्षातच आले नव्हते येताना या दोघांची मेडिकल हिस्ट्री आणली नव्हती. परिणामी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेणूने तेव्हा जन्म दिलेली तीन पिले दगावली होती. त्या प्रकारानंतर सारे काही नाॅर्मल झाले असताना राजा रेणू प्राणिसंग्रहालयात रुळले. १० सप्टेंबर रोजी रेणूने दोन बछड्यांना जन्म दिला. दोन्ही नर होते. एकाचे वजन ६०० ग्रॅम दुसऱ्याचे ५०० ग्रॅम होते. आज या दोन्ही बछड्यांचा पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू आपल्या पिलांची व्यवस्थित काळजी घेत होती. मागचा अनुभव ध्यानात घेत प्रशासनाने फक्त केअरटेकरलाच रेणूजवळ जाण्याची मुभा दिली होती. ११ तारखेला रेणूने पुरेसे बीफही खाल्ले. बछड्यांनाही पाजले. रात्री अकरा वाजता बछडे रेणूची पाहणी करण्यात आली असता सगळे नाॅर्मल होते. पण आज पहाटे साडेचार वाजता हे दोन्ही बछडे मृतावस्थेत आढळले.

किटॉन बॉडीज वाढल्या
तज्ज्ञांच्या पाहणी शवविच्छेदनात अनैसर्गिक असे कारण आढळले नाही. पण या पिलांच्या शरीरात किटाॅन बाॅडीज वाढल्याचा अंदाज आहे. रक्तात पुरेसे इन्सुलिन नसल्यास शरीरात किटाॅन बाॅडीज तयार होतात. या किटाॅन बाॅडीज अॅसिडिक असतात. पिलांच्या शरीराचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत तसेच काही नमुने विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेतही पाठवले जाणार असून तपासणीनंतरच मृत्यूचे कारण समजेल.
बातम्या आणखी आहेत...