आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Repairing Of Major Roads In Aurangabad To Begin From December

अकरा मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचा मुहूर्त डिसेंबरात, रस्ते दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खड्डय़ांमुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवणार्‍या शहरवासीयांना सार्वजनिक बांधकाम विभागाने गुळगुळीत रस्त्याची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. शहराशी जोडलेल्या 11 मुख्य रस्त्याच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून डिसेंबर महिन्यात सा.बां. विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जाणार आहेत.

उद्योग व पर्यटननगरी म्हणून ख्याती असलेल्या शहराची गेल्या काही दिवसांत खड्डय़ांचे शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी मनपाची असताना निधीअभावी पालिकेला हे काम करणे शक्य होत नव्हते. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत नागरिकांची ओरड पाहता सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 21 कोटींचा निधी मंजूर केला.

निधी प्राप्त होताच अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांनी शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी करून कामांचे अंदाजपत्रक तयार केले व निविदा काढण्याचा निर्णय घेतला. या कामांच्या निविदा 21 नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार असून डिसेंबर महिन्यात काम सुरू केले जाणार आहे.तीन महिन्यांत होणार या रस्त्यांचे काम

0गोलवाडी ते नगर नाका

0नगर नाका ते बाबा पेट्रोलपंप

0क्रांती चौक ते सिडको बसस्थानक चौक

0सिडको चौक ते हसरूल टी पॉइंट

0दिल्ली गेट ते हसरूल टी पॉइंट

0सुभेदारी ते बाबा पेट्रोलपंप चौक

0पैठण रोडसह पीडब्ल्यूडीच्या मालकीचे अन्य रस्ते

कंत्राटदारांना लगाम

0तीन महिन्यांत काम पूर्ण करावे

0तीन वर्षांत रस्ता खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदाराचीच

0तीन वर्षे पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराची अनामत परत केली जाणार नाही

0निकृष्ट कामामुळे कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल

असे होईल काम

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नगर नाका ते बाबा पेट्रोलपंप चौक जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता चारपदरी, क्रांती चौक ते सिडको बसस्थानक चार किलोमीटर आणि सिडको ते चिकलठाणा विमानतळ 3.8 किलोमीटरचा रस्ता चारपदरी केला जाणार आहे, तर बाबा ते क्रांती चौक या दीड किलोमीटरच्या रस्त्याची मालकी महानगरपालिकेची असल्याने याचे काम त्यांनाच करावे लागेल. सिडको बसस्थानक ते हसरूल टी पॉइंटपर्यंतचा रस्ता एमएसआरडीसीकडून पीडब्ल्यूडीकडे हस्तांतरित झाल्याने हे कामही समाविष्ट करण्यात आलेले आहे.