आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Repairing Of Water Filtration Plant Near Aurangabad

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत, जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्‍ती पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मंगळवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात तीन ठिकाणी चाललेल्या दुरुस्तीमुळे औरंगाबादला होणारा पाणीपुरवठा तब्बल 9 तास बंद ठेवण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास पंपिंग सुरू झाल्यानंतर औरंगाबादला पाणी येण्यास सुरुवात झाली. बुधवारी अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या 100 एमएलडीच्या दोन हौदांसाठी असलेल्या फिल्टरेशन पाइपला तीन ठिकाणी गळती लागली होती. चार तारखेला दुपारी चार वाजेपासून ही गळती सुरू झाली. परिणामी, पाण्याच्या शुद्धीकरणाचा वेग मंदावला. मंगळवारी पाण्याचे पंपिंग बंद करून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व उपअभियंता के. एम. फालक आणि त्यांच्या 20 जणांच्या टीमने तीन वेगवेगळ्या ठिकाणी असलेली गळती बंद करण्याचे काम हाती घेतले. दुपारी दोन वाजता औरंगाबादला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास पाण्याचे पंपिंग थोड्या प्रमाणात सुरू करून हौद भरण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वेल्डिंगचे काम सुरू होते. सव्वा वाजेच्या सुमारास हे काम पूर्ण झाल्याने पूर्ण क्षमतेने पाण्याचे पंपिंग सुरू करण्यात आले. त्यानंतर पाण्याचे शुद्धीकरण सुरू झाले व पाणी औरंगाबादला रवाना झाले. दरम्यान, या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने औरंगाबाद शहरातील पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्या होत्या. त्या भरण्यास वेळ लागल्याने बुधवारी शहराच्या अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. आता शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले.