आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक उड्डाणपुलावर दुरुस्ती; खाली चक्कजाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रायोगिक तत्त्वावर कोल्डमिक्स तंत्राच्या साहाय्याने क्रांती चौकातील उड्डाणपुलावर रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतल्याने दिवसभर पुलाखाली वाहतुकीची कोंडी झाली होती. सुटीच्या दिवशी कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांचे हालच झाले.

क्रांती चौकातील उड्डाणपुलावरील रस्ता अतिशय खराब झाला आहे. दोन्ही बाजूंना खड्डेही पडले आहेत. मध्यंतरी काही खड्डे सिमेंट टाकून बुजवण्याचा प्रयत्नही झाला होता. पण नंतर दुरुस्तीचे काम काही झाले नाही. परिणामी पुलावरचा रस्ता अतिशय खराब झाला होता.
आज या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले. तेही प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीच्या एका कंपनीने मायक्रो सरफेसिंगच्या कामात कोल्ड ट्रीटमेंटची यंत्रणा आणली आहे. त्या कंपनीला या कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी क्रांती चौकातील उड्डाणपुलाची निवड करण्यात आली. या कामासाठी दिवसभर उड्डाणपूल बंद ठेवण्यात आला होता. पुलावरील रस्त्याचा पृष्ठभाग स्वच्छ करून त्यावर तो थर टाकण्याचे काम बरेच वेळ खाणारे होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत पुलावरची वाहतूक बंद होती. पूलच बंद असल्याने दोन्ही दिशांनी येणाऱ्या वाहनांची पुलाखाली कोंडी झाली. त्यात चौकातील सिग्नलचा कालावधी कमी असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बसेस, चारचाकी, दुचाकी रिक्षा यामुळे पुलाच्या बाजूच्या छोट्या रस्त्यावर बराच काळ वाहने खोळंबून राहिली होती. सुटीच्या दिवशीही वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने वाहनचालकांमध्ये रोष पसरला होता. त्यात पुन्हा रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी जे वळण आहे तेथे थांबलेल्या रिक्षांमुळे कोंडीत भर पडली.

स्वच्छतेला वेळ लागला
पुलाच्याकामाबाबत एमएसआरडीसीचे उपअभियंता उदय बरडे म्हणाले की, सरफेसिंगचे काम करताना रस्त्याचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यात जास्त वेळ लागतो. त्यानंतर त्या पृष्ठभागावर कोल्ड ट्रीटमेंट करण्यात आली. त्यानंतर दोन तासांतच तो पृष्ठभाग वापरासाठी सुरू करण्यात आला.

सिग्नल अपुरा
क्रांतीचौकातील वाहतूक बेटाचा आकार मोठा आहे. त्यामुळे सिग्नल सुटल्यावर वळून जाईपर्यंत सिग्नल हिरवा राहत नाही. परिणामी दोन, तीन बाजूंच्या वाहनांची काेंडी तेथे होत असते. आजही तोच अनुभव अधिक तीव्रपणे नागरिकांना आला.
डागडुजीच्या कामासाठी रविवारी क्रांती चौक उड्डाणपूल रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे जालना रोडवरील सर्व वाहतूक पुलाखालील रस्त्यांवरून वळवल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. छाया : दिव्य मराठी
बातम्या आणखी आहेत...