आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Request To Chief Minister For Incorporate Satara In Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा आणि देवळाई परिसर महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यासाठी मनपातील पदाधिका-यांचे शिष्टमंडळ उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांसाठी आचारसंहिता लागू होण्याआधी किमान २५ कोटी तरी द्या, अशी मागणी करण्यात येणार आहे.

नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आलेल्या सातारा व देवळाई परिसरावर मनपाने दावा केला असून साता-याच्या आरक्षणाच्या सोडतीच्याच दिवशी सर्वसाधारण सभेने हा भाग मनपा हद्दीत समाविष्ट करावा, अशी मागणी करणारा ठराव मंजूर केला. हा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दुसरीकडे औरंगाबाद मनपा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. त्या आधी साता-याबाबत सरकारला निर्णय घ्यायची विनंती करण्यासाठी मनपातील पदाधिका-यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले आहे. उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी भेट घेऊन हे शिष्टमंडळ आपली मागणी रेटणार आहे. आधी फक्त शिवसेनेने दाखल केला म्हणून या प्रस्तावाला विरोध करणा-या भाजपने सरकार सातारा व परिसराच्या विकासासाठी निधी देणार असेल, तर तो भाग मनपा हद्दीत घ्यायला हरकत नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना आणि भाजप हे दोघेही राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांच्यासाठी सकारात्मक निर्णय घेणे सोयीचे ठरेल, असा आडाखा बांधण्यात आला आहे.

रस्त्यांसाठीही निधी द्या
मनपा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. मनपाच्या तिजोरीत खडकू नसल्याने शहरातील रस्त्यांची सगळी कामे ठप्प आहेत. जागोजाग खड्डे, अर्धवट तयार करण्यात आलेले रस्ते अशी बिकट अवस्था आहे. आचारसंहितेआधी पैसे मिळाल्यास काही कामे मार्गी लागतील व रस्त्यांमुळे मतदारांच्या मनात असणारा रोष काहीसा कमी करता येईल, या हेतूने हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे २५ ते ३० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. या शिष्टमंडळात महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे यांचा समावेश आहे.