आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Research In Education Website And Mobile Teaching

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षणपद्धतीत बदलाचे वारे; वर्गखोल्यांऐवजी संकेतस्थळ, मोबाइलवरही शिकवणे शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिक्षण पद्धतीमध्ये सध्या आमूलाग्र बदलांचे वारे आहे. त्याअंतर्गतच या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित ‘नवी तालीम’ शिक्षण पद्धतीचा प्रयोग लवकरच सुरू केला जाणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) च्या समन्वयातून ही नवी शिक्षण व्यवस्था रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच ‘महाराष्ट्र मेटा युनिव्हर्सिटी’ची स्थापना करून संकेतस्थळ, मोबाइलवरही शिक्षण पद्धती उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मेटा युनिव्हर्सिटीचा अंमल केला जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1937 ला हा विचार मांडला होता. त्याप्रमाणे ‘नवी तालीम’अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर छोटे-छोटे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. सॅम पित्रोदा यांनी मेटा युनिव्हर्सिटीजची संकल्पना केंद्र सरकारला सादर केली आहे. देशात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवे अभ्यासक्रम राबवण्यात आले तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात अथवा वर्गात जाऊन शिक्षण घेण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील.
राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला असून पुण्यामध्ये 3 व 4 ऑगस्ट रोजी मेटा युनिव्हर्सिटीजसाठी परिषद घेण्यात आली आहे. ज्येष्ठ अनुवैज्ञानिक अनिल काकोडकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, विवेक सावंत, डॉ. अभय बंग, डॉ. राम ताकवाले आदींनी मेटा युनिव्हर्सिटीजविषयी आपले विचार मांडले. सर्व मान्यवरांनी सादरीकरण केल्यानंतर सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली.
विद्यापीठातही झाले प्रक्षेपण
पुणे येथे पार पडलेल्या मेटा युनिव्हर्सिटीच्या परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रसारण करण्यात आले. अकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या सभागृहात झालेल्या ‘वेब कास्ट’मध्ये कॉलेजचे संचालक डॉ. महेंद्र शिरसाट यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट केली. एमकेसीएलचे विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा यांनी मेटा युनिव्हर्सिटीजची संकल्पना उपस्थितांना समजावून सांगितली. विद्यापीठाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख आणि अकॅडमिक स्टाफ कॉलेजचे 125 जण ई-कम्युनिकेशनच्या माध्यमातून सहभागी झाले होते. प्रा. डॉ. उत्तम अंभोरे आणि डॉ. भारती गवळी यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.
मोबाइलवरही शिक्षण देणे शक्य
प्रगतीची आपण अशी शिखरे गाठत आहोत की, वर्गात जाऊन पारंपरिक पद्धतीने शिकण्याची भविष्यात गरजच भासणार नाही. संकेतस्थळ, मोबाइलवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अभ्यासक्रमांची संरचना करता येऊ शकेल. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून अंमलात आणण्यासाठी निश्चित किती कालावधी लागेल हे आताच सांगता येणार नाही.’’ बालकिशन बलदवा, विभागीय समन्वयक, एमकेसीएल