आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात ११ वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नव्वद टक्क्यांवर गुण मिळवणारे विद्यार्थी आयआयटी किंवा मेडिकल, इंजिनिअरिंगला जातात. बेसिक सायन्सकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे हे लक्षात आल्याने सरकारने ११ वी-१२ वीतील विद्यार्थ्यांसाठी रिसर्च कॅम्पचे आयोजन केले आहे. यंदा दिवाळीनंतर या कॅम्पसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागातील डीएनए बारकोड केंद्राची निवड केली आहे. केंद्र संचालक डॉ. गुलाब खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होणार असून नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ यात मार्गदर्शन करतील.
उच्च माध्यमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. देशभरातील अकरावी, बारावी विज्ञान शाखेतील मुलांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल. दहावीच्या गुणांवर त्यांची निवड केली जाईल. देशभरातील ५० हजार विद्यार्थ्यांना ७७ विद्यापीठांत असे प्रशिक्षण दिले जाईल.

काय आहे उपक्रम
इनोव्हेशनइन सायन्स परसूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च (इन्स्पायर)असे या उपक्रमाला नाव दिले असून हुशार विद्यार्थी फक्त डॉक्टर, इंजिनिअर होता शास्त्रज्ञ व्हावेत, यासाठी हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाची माहिती आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक विद्यापीठात दोनशे विद्यार्थ्यांना पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. यात देशातील दिग्गज शास्त्रज्ञांसह जगभरातील नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे मानधन प्रमाणपत्रही मिळणार आहे.

काय आहेत अटी..
स्टेडबोर्डात ९३.२ टक्के गुण, सीबीएसई बोर्डात- सीजीपीए-ए-१ ग्रेड आाणि आयसीएसई बोर्डात ९५ टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत अर्ज करायचे आहेत. विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, जेवण प्रवासाचा खर्च सरकार देणार आहे.

कुठे कराल संपर्क
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील डॉ. गुलाब खेडकर यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पॉल हबर्ट सेंटर, डीएनए बार कोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज केंद्राशी संपर्क साधून नावे नोंदवावीत, असे आवाहन डॉ. खेडकर यांनी केले आहे.

उपक्रमाची तारीख विद्यार्थ्यांना कळवणार
^प्रथम अर्जांची छाननी होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही उपक्रमाची तारीख कळवणार आहोत. मेरिटमध्ये येणारे सर्वच विद्यार्थी आयआयटी करून विदेशात जातात किंवा डॉक्टर, इंजिनिअर होतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात येऊन देशाच्या प्रगतीस हातभार लावावा हाच सरकारचा हेतू आहे. -डॉ.गुलाब खेडकर, समन्वयक, इन्स्पायर कार्यक्रम
बातम्या आणखी आहेत...