आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन: दहा इंचांची बाइक धावते ताशी पंधरा कि. मी.

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उंची केवळ दहा इंच, वजन चार किलो सातशे ग्रॅम, इंधन बॅटरीची ऊर्जा, वेग ताशी पंधरा कि. मी. हे वर्णन आहे, सर्वात छोट्या दुचाकीचे. 80 किलोची व्यक्ती या दुचाकीवरून सफरही करू शकते. आशिया खंडातील सर्वात छोटी दुचाकी म्हणून लौकिकप्राप्त या बाइकचा निर्माता पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. शेख अफरोज मुश्ताक असे त्याचे नाव असून या संशोधनाची दखल आशिया आणि इंडिया बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डनेही घेतली.


रोशन गेट येथील रहिवासी अन् उस्मानपुरा येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत शेख मुश्ताक यांचा 23 वर्षीय मुलगा शेख अफरोजने नवनिर्मितीचा ध्यास घेतला. प्रथम वर्षी (2011) गवत कापणे व ग्राइंडरचे काम करणार्‍या पेट्रोल दुचाकी, दुसर्‍या वर्षी (2012) सौर ऊर्जेवरील बाइक आणि त्यानंतर तिसर्‍या वर्षी (2013) पाण्यावर धावणारी मोटार बाइक त्याने तयार केली.अंतिम वर्षात (2014) सर्वात छोट्या बाइक ची निर्मिती अफरोजने केली.


म्हैसूरच्या बाइकचा मोडला विक्रम
संतोष कुमार या म्हैसूरच्या युवकाने 2010 मध्ये 13 इंच बाइकची निर्मिती केल्याचा उल्लेख अफरोजला संकेतस्थळावर आढळला. हा विक्रम मोडण्याचे ठरवून त्याने 150 वॉटच्या डीसी (डायरेक्ट करंट) मोटारच्या इंजिनची बाइक तयार केली आहे. बारा व्होल्ट 15 अँम्पिअरची बॅटरीचा इंधनासाठी वापर केला आहे. ही बाइक ताशी पंधरा कि.मी.च्या वेगाने धावणारी असून आशियातील सर्वात छोटी दुचाकी म्हणूनही मान्यता मिळाली आहे. 22 नोव्हेंबर 2013 रोजी इंडिया, आशिया, लिम्का आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी अफरोजने नामांकन पाठवले होते. आतापर्यंत आशिया आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानांकन अफरोजला प्राप्त झाले. दोन मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे अफरोजला मिळाली आहेत. आता त्याला लिम्का आणि गिनीज बुकमध्ये रेकॉर्डची अपेक्षा आहे.


साईड स्टँडवर सुरक्षेची जबाबदारी
डिझाइनसह तीन महिन्यांत एकट्या अफरोजने ही दुचाकी तयार केली. दुचाकीला एक यूएसबी पोर्ट दिला असून त्यावर मोबाइल चार्जिंगची सोय आहे. शिवाय जोपर्यंत साइड स्टँड काढले जात नाही, तोपर्यंत बाइक सुरूच करता येत नाही.