आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणामुळ नवीन चेह-यांना संधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड - पाचोड जिल्हा परिषद गट व गण इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. आरक्षणामुळे नवीन चेह-यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी चालून आली असून अनेक जण आपापल्या सौभाग्यवतींच्या उमेदवारीसाठी त्या त्या पक्षांच्या प्रमुखांकडे मनधरणी करीत आहेत. एकतुनी गण हा खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी राखीव आहे. त्यामुळे प्रस्थापित आपले प्रस्थ टिकवण्यासाठी एकतुनी गणावर डोळा ठेवून आहेत.
एकतुनी गण हा खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी राखीव असून पंचायत समिती सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे अनेकांना जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा पंचायत समितीचे सभापतिपद मिळवण्याचे डोहाळे लागले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे विजयी झाले होते. पाचोड जिल्हा परिषद गटाची जागा त्यांच्यासाठी महत्त्वाची समजली जाते. परंतु फेब्रुवारीत होणा-या निवडणुकीसाठी ही जागा इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने माजी आमदार संदिपान भुमरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. बद्रीनारायण भुमरे यांची गोची झाली आहे. पाचोड गट इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने मातब्बर, प्रस्थापितांचा हिरमोड झाला आहे. त्यांना या गटासाठी फारसे स्वारस्य असल्याचे दिसत नाही.
उमेदवारीसाठी शेकडो कार्यकर्ते आपापल्या पक्षांच्या नेत्यांचे उंबरठे झिजवत असले तरी यात जवळच्या, एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. पाचोड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात कोणत्याही पक्षातील उमेदवाराला उमेदवारी मिळाली तरी ते नवखेच असणार आहे. 15 वर्षे तालुक्यावर शिवसेनेची अधिसत्ता गाजवणारे माजी आमदार संदिपान भुमरे व राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरणार आहे. नगरपरिषदेत सत्ता काबीज करणारे काँग्रेसचे रवींद्र काळे, जितसिंग करकोटक हेही आता सत्ता खेचण्यासाठी त्यांचे उमेदवार उभे करीत आहेत. पाचोड गटातील एकतुनी हा पंचायत समितीचा गण आहे. हा गण खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी राखीव असल्याने पैठण पंचायत समिती सभापतिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. काही इच्छुकांनी तर आपला प्रचार देखील सुरु केला आहे.