आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Result In 45 Days Dr.bamu University Affidaivit In Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

45 दिवसांत निकाल, विद्यापीठांतर्फे सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांनी घेतलेल्या विविध परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर करण्याची ग्वाही देणारे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी उच्च न्यायालयासमोर राज्य सरकारने सादर केले. त्यानुसार राज्यभरातील सर्व विद्यापीठांचे निकाल जूनअखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्राध्यापकांनी केलेल्या संपामुळे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या निकालांना उशीर होणार असल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे प्राध्यापकांना जादा तास काम करण्याचे आदेश देऊन निकाल वेळेवर जाहीर करावेत, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती आर. वाय. गानू व न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे याबाबत सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याबाबत राज्य सरकार व विद्यापीठांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने योग्य वेळी निकाल जाहीर करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने 15 जूनपर्यंत, तर सोलापूर विद्यापीठाने लवकरच निकाल जाहीर करणार असल्याची माहिती दिली. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने व नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने 45 दिवसांत निकाल घोषित करणार असल्याचे सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जून रोजी होणार आहे.
उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी अधिकार मंडळ सरसावले
पुणे विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम अद्याप प्रलंबितच असल्याने या कामाला गती देण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने पुढाकार घेतला आहे. उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी काही प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील ज्या प्राध्यापकांनी अद्यापही विद्यापीठात हजेरी लावली नाही त्यांना विद्यापीठात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच त्यांची नावेही परीक्षा विभागाने विद्यापीठातील सर्व प्राचार्यांकडून मागवली आहेत.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पार पडल्या होत्या. याच कालावधीत प्राध्यापकांच्या एम. फुक्टो या संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलनही छेडले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर या संघटनेने बहिष्कार घातला होता. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सुमारे हजार प्राध्यापक सहभागी झाले होते. हे आंदोलन मिटल्यानंतर विद्यापीठात उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला सुरुवात झाली असली तरीही उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी परीक्षा विभागाच्या पूर्वनियोजनानुसार असणारी प्राध्यापकांची संख्या अद्याप उपलब्ध न झाल्याने विद्यापीठाने अनुपस्थित प्राध्यापकांना इशारा देणारे हे फर्मान काढले आहे.
पेपर तपासणी पूर्ण
मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीएस्सी, एमएस्सी, बीएड, फार्मसी, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग आदी अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे 93.65 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे डेप्युटी रजिस्ट्रार डी. डी. घुगे यांनी न्यायालयाला दिली.