आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retire Bank Officer Face Harassment From Sbi Bank

आयडीबीआयच्या निवृत्त अधिकार्‍याला एसबीआयचा फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खिशात पैसा बाळगण्याचा धोका टाळण्यासाठी खरेदीकरिता क्रेडिट कार्डाचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, क्रेडिट कार्ड देणार्‍या कंपन्यांच्या मनमानी कार्यप्रणालीमुळे ग्राहकाला विनाकारण मनस्ताप होतो. आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकपदावरून निवृत्त झालेले प्रभाकर बांडे यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यांची व्यथा त्यांच्याच शब्दांत..

मी आयडीबीआय बँकेतून 1998 मध्ये व्यवस्थापकपदावरून निवृत्त झालो. बँकेत काम केल्यामुळे या क्षेत्रातील कार्यप्रणालीची मला चांगलीच माहिती आहे. तब्बल 10 वर्षांपूर्वी मी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले. या कार्डाचा मी पुरेपूर वापर केला. भरपूर खरेदी केली. थोडक्यात, कार्डावरून सतत व्यवहार सुरू ठेवले. बँकेच्या वतीने मला दरमहा घरपोच स्टेटमेंट येत होते. एसएमएस आणि फोन कॉलद्वारेही कंपनी सतत संपर्कात असायची. नवीन ऑफर्सची माहिती दिली जायची. कार्डाच्या कार्यपद्धतीमुळे मीसुद्धा समाधानी होतो.

पत्रव्यवहाराला कचर्‍याची टोपली

बँकेच्या या भोंगळ कारभाराची चीड आल्यामुळे मी याचा जाब विचारण्याचे ठरवले. त्यानुसार मी स्टेट बँक, क्रेडिट कार्डचे स्थानिक कार्यालयापासून ते थेट दिल्ली मुख्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला; पण मला कोणीच दाद दिली नाही. आतापर्यंत 9 ऑगस्ट 2011, 16 सप्टेंबर 2011, 18 ऑक्टोबर 2011 आणि 17 जानेवारी 2012 रोजी पत्रव्यवहार करून माझे कार्ड बंद करण्याचे कारण विचारले; परंतु एकाही पत्राला उत्तर मिळालेले नाही. माझे सर्व व्यवहार व्यवस्थित आहेत. मी एकदाही पैसे बुडवलेले किंवा थकवलेले नाहीत. मग अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देण्याचे काय कारण असावे, असा प्रश्न पडलाय. माझ्याकडे अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड्स आहेत. या कार्डांमुळे माझे व्यवहार बंद झालेले नाहीत; पण निदान मला कार्ड बंद करण्याचे कारण सांगितले जावे, एवढीच अपेक्षा आहे. कार्ड नेमके कशामुळे बंद केले? असे कार्ड बंद करण्यापूर्वी संबंधित कार्डधारकाला कल्पना देण्याचा नियम आहे की नाही? निदान पत्रव्यवहार केल्यावर तरी त्याबाबत माहिती दिली जावी, असे मला वाटते.

एसबीआयचा नो रिप्लाय

याबाबत एसबीआयच्या अधिकार्‍यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु बोलणे होऊ शकले नाही.

अचानक दिला धक्का

सर्व काही सुरळीत सुरू असताना एप्रिल 2010 पासून माझे कार्ड अचानक बंद करण्यात आले. बँकेच्या वतीने 13 एप्रिल 2010 च्या तारखेचे शेवटचे स्टेटमेंट मला मिळाले. त्यानंतर एसबीआयने कोणताच संपर्क ठेवला नाही. माझे स्टेटमेंट, मेसेज सर्वकाही बंद झाले. बँकेने अचानक दिलेल्या धक्क्यामुळे माझी खूप गैरसोय होत आहे.


कार्ड सुरू करा

माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला, ज्याने अख्खी हयात बँक क्षेत्रातच घालवली त्याला एसबीआयने दिलेली वागणूक अपमानास्पद आहे. मला कार्ड बंद करण्याचे कारण सांगणे किंवा पत्रांना उत्तर देणे अपेक्षित होते; पण बँकेने दोन्ही बाबी केलेल्या नाहीत. बँकेने एकतर कार्ड सुरू करावे, नाहीतर बंद करण्याचे कारण तरी सांगावे.
प्रभाकर बांडे, तक्रारदार.