आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्था बदलणे आवश्यक; निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गुन्हे, दंगली आणि अतिरेकी हल्ल्यांचे प्रमाण वाढण्याला कालबाह्य शासनव्यवस्था आणि पोलिसांचे दिशाहीन नेतृत्व कारणीभूत आहे. ही व्यवस्था मानवनिर्मित असून बदलणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केले. तापडिया नाट्यगृहात मंगळवारी (8 ऑक्टोबर) शिवाजीराव चौधरीलिखित ‘देवा शपथ खरं सांगेन’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

सेवानिवृत्ती पोलिस अधिकारी संघटनेच्या वतीने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष तथा निवृत्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत पवार, गोपाळ जगताप, लेखक शिवाजीराव चौधरी, रजत प्रकाशनचे अशोक कुमठेकर उपस्थित होते.

देशातील पहिली दंगल मुंबईत ब्रिटिशांच्या काळात (1893) झाली होती. आपण भारतीयांनी त्या वेळी तत्कालीन ब्रिटिश पोलिस आयुक्तांच्या वाहनावर दगडफेक केली होती. त्यानंतर शंभर वर्षांनी मशीद पाडल्याच्या दंगलीत मुंबईकरांनी (1993) पोलिस आयुक्तांच्या कारवर दगडाऐवजी बॉम्ब फेकण्यापर्यंत आपण प्रगती केली असल्याचे खोपडे यांनी सांगितले. ज्या सुधारणावादी धोरणात प्रगती होणे अपेक्षित होते, ते होण्याऐवजी आपण हिंस्र झालो आहोत. भ्रष्ट आणि सोयवादी राजकीय व्यवस्था (कॅबिनेट) आणि पोलिसांमध्ये अकार्यक्षम नेतृत्व तथा व्हीजनचा असलेला अभाव या कारणांचा समावेश आहे. दोन्ही घटक व्यवस्थेचे कैदी असून त्यांनी स्वत:च्या क्षणभंगुर स्वार्थासाठी स्वातंत्र्यानंतर 60-65 वर्षांतही बदल होऊ दिला नसल्याची गंभीर टीका त्यांनी केली.

हृदयाचे स्नायू मजबूत करा : पोलिस प्रशिक्षणात मांडीच्या स्नायूंना मजबुती देण्याऐवजी हृदय, मेंदूला मजबुती देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जगताप, चौधरी, कुमठेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनंत काळे यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.