आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त पोलिस निरीक्षक पित्यानेच डांबले मुलीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस निरीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या एका पित्याने मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करत तिला औरंगाबादेत डांबून ठेवले होते. मात्र तिच्या प्रियकराने दिल्लीत तक्रार दिल्यामुळे गुरुवारी (25 जुलै) त्याचे बिंग फुटले. सिडको पोलिसांनी शुक्रवारी संबंधित तरुणीला छत्तीसगडमधील रायपूर येथील प्रियकराच्या स्वाधीन केले. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी मुलीची बदनामी टाळण्यासाठी गोपनीय पद्धतीने ही कार्यवाही पूर्ण केली.

बिहार येथील बेथिया येथे कायद्याचे रक्षण करणार्‍या पोलिस निरीक्षकाने मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करण्यासाठी औरंगाबादेत कायदा हातात घेतला आहे. औरंगाबादेतील भावाच्या प्रस्थापित उद्योग समूहामुळे वर्मा (आडनाव बदलले आहे) कुटुंबीय येथेच स्थायिक झाले आहेत. त्यांचा सिडको परिसरात प्रशस्त बंगला आहे. भावाकडेच राहत असलेली 24 वर्षीय कन्या जान्हवी वर्मा (बदललेले नाव) ही पुण्यात एमबीएचे शिक्षण घेत होती. जान्हवी महाविद्यालयातील आशिष अग्रवाल या मित्राच्या प्रेमात पडली. चार वर्षांपूर्वी प्रेमाच्या आणाभाका घेणार्‍या या युगुलाने विवाह करण्याचे सुनिश्चितच केले होते. मात्र प्रेमप्रकरणाची तिच्या घरच्यांना ‘भणक’ लागल्यामुळे तिला अनेक महिन्यांपासून कोंडून ठेवले होते. एमबीए शिक्षणानंतर दिल्ली येथे ‘लव्ह कमांडो’ या धर्मादाय संस्थेचे (एनजीओ) काम करणार्‍या आशिषने दिल्ली पोलिसांकडे औरंगाबादेत प्रेयसीला डांबून ठेवल्याची तक्रार दिली होती. तिच्या आई-वडिलांनीच छळ चालवल्याचेही त्याने तक्रारीत नमूद केले होते. गुरुवारी चावरिया यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी जान्हवीला ताब्यात घेतले. तिचा जबाब नोंदवून तिच्या र्मजीनुसार आशिषकडे पाठवले आहे.

पोलिस उपनिरीक्षक शिल्पा लांबे आणि महिला पोलिसांच्या ताफ्यासह तिला मुंबईपर्यंत कारने तर त्यानंतर छत्तीसगड येथे विमानाने रवाना केले. मुलगी अविवाहित असली तरी ती सज्ञान असल्यामुळे तिच्या इच्छेनुसार पोलिसांनी युगुलाची भेट करून दिली. शुक्रवारी पोलिसांचे विशेष पथक औरंगाबादेत परतले आहे.


उपाशी ठेवून छळ केल्याचा पोलिसांना संशय-
जान्हवीला अनेक महिन्यांपासून डांबून ठेवल्यामुळे तिच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. शिवाय अन्नपाण्याविना तिचे हाल झाल्यामुळे तिची अंगकाठी सडपातळ झाली आहे. रायपूर येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ते लवकरच विवाह करणार आहेत. दरम्यान, सिडकोचे पोलिस निरीक्षक ठाकरे प्रकरणाचा तपास करत आहेत.