आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर विभागाने केला २७११ कोटींचा महसूल जमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद विक्रीकर विभागाने २०१४-१५ या वर्षात २७११ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक महसूल जमा करण्यात विक्रीकर विभागाला यश आले आहे. त्यामुळे २०१५-१६ साठी या विभागाच्या वतीने ३०४१ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) डी. एम. मुगळीकर यांनी "दिव्य मराठी'ला दिली आहे.

औरंगाबाद विक्रीकर विभागाच्या वतीने औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांचा महसूल जमा केला जातो. यामध्ये मूल्यवर्धित कर, केंद्रीय विक्रीकर, व्यवसाय कर यासह अनेक करांची वसुली करण्यात येते. या तीन जिल्ह्यांत मिळून २७११ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न या विभागाला मिळाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वाधिक उत्पन्न : विक्रीकरविभागाने २०१४-१५ या वर्षासाठी २७६७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी २७११ कोटी ४४ लाख रुपयांचा कर गोळा करण्यात या विभागाला यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक महसूल औरंगाबाद जिल्ह्यातून जमा झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी २४३२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना २३९० कोटी रुपये (९८.३० टक्के) जमा झाले आहेत, तर बीड जिल्ह्यात १२१.०३ कोटींचे उद्दिष्ट १०९ कोटी ८३ लाख (९०.७४ टक्के) रुपये जमा झाले आहेत, तर जालना जिल्ह्यात २१४ कोटी ४० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना २१० कोटी ६८ लाख (९८.२६ टक्के) रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी वर्षात ३३० कोटी रुपयांच्या अधिकचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मंदीचा फटका
मुगळीकर यांनी सांगितले की, दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले. त्यातच सरकारकडून कापसावरचा कर टक्क्यांवरून टक्क्यांवर आणला. कापसाच्या गाठीचे उत्पादन कमी झाल्यामुळे २५ ते ४० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जालन्यात स्टीलच्या मंदीचा फटकादेखील महसूल वाढीला बसला. तसेच सोयाबीनच्या कमी उत्पादनामुळे त्यावरील प्रकिया उद्योगातून काही प्रमाणात महसूल मिळाला. दुष्काळामुळे उलाढाल कमी झाल्याने महसूल वाढीवर परिणाम झाला.

सहाशे कोटींवरून २७०० कोटी रुपयांची वाटचाल
२७११ कोटीं पैकी सर्वाधिक महसूल व्हॅटच्या माध्यमातून २४७५ कोटी, केंद्रीय विक्री करातून १५३ कोटी ५८ लाख, तर व्यवसाय करांच्या माध्यमातून ६८.५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मूल्यवर्धित कर लागू झाला त्या वेळी उद्दिष्ट ६०० कोटी असताना ६५६ कोटींचा महसूल जमा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हा महसूल वाढत गेला. २००६-०७ मध्ये ८१३ कोटी उद्दिष्ट असताना ८४५ कोटी महसूल जमा झाला. त्यानंतर २००७-०८ मध्ये ८५३ कोटी, २००८-०९ मध्ये ९२९ कोटी जमा झाले. त्यानंतर २०१४-१५ मध्ये हा आकडा २७११ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

३३० कोटींचे अधिकचे उद्दिष्ट
औरंगाबाद विक्रीकर विभागाने गेल्या वर्षीपेक्षा ३३० कोटींचे अधिकचे असे ३०४१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी उलाढाल कमी झाल्यामुळे परिणाम झाला होता. मात्र, या वर्षी ३००० कोटींपेक्षा अधिकचा महसूल गोळा करण्यात आम्ही यशस्वी होऊ. त्या दृष्टीने विभागाच्या वतीने प्रयत्नदेखील सुरू केले आहेत. डी.एम. मुगळीकर, विक्रीकर सहआयुक्त, व्हॅट प्रशासन
महसूल
वर्ष उद्दिष्ट जमा (कोटी)
२०११-१२ २३५७ १९९८.६५
२०१२-१३ २३७१ २३६०
२१०३-१४ २६५० २४५३
२०१४- १५ २७६७ २७११