आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल विभागाती कर्मचा-यांचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल नायब तहसीलदारापासून ते शिपायापर्यंत महसूल कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाच्या दुस-या दिवशी शनिवारी जिल्हाधिकारी तसेच सर्व तहसील कार्यालये ओस पडली आहेत. याचा फटका महाविद्यालयीन प्रवेशासाठी आतुर असलेल्या विद्यार्थ्यांना बसत आहे. रहिवासी, जात तसेच उत्पन्न प्रमाणपत्राशिवाय त्यांचे प्रवेश होऊ शकत नाहीत. संपामुळे या सर्वांचेच प्रवेश लांबणार आहेत.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार ही मंडळी कार्यालयात हजर असली तरी त्यांना पाणी आणून देण्यासाठीही कोणी कार्यालयात नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले असले तरी ही चर्चा 6 ऑगस्ट (बुधवार) होणार असल्यामुळे हा संप बुधवारपर्यंत लांबण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे, तरीही रविवारी मुख्यमंत्री यात हस्तक्षेप करू शकतात, असेही काहींनी म्हटले आहे.

नायब तहसीलदारांपासून कनिष्ठ कर्मचारी संपावर असतानाच येत्या 5 ऑगस्टपासून उपजिल्हाधिकाºयांनीही त्यांच्या मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या दोन्हीही संपांचा फटका सध्या प्रवेशासाठी जात, उत्पन्न तसेच रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी तहसील कार्यालयांत धाव घेणारे विद्यार्र्थी आणि पालकांना बसणार आहे. या प्रमाणपत्रांवर नायब तहसीलदार, तहसीलदार तसेच उपजिल्हाधिका-यांची स्वाक्षरी लागते. नायब तहसीलदार नाहीत. नंतर उपजिल्हाधिकारी असणार नाहीत. त्यामुळे वरील प्रमाणपत्रांचे अर्ज पडून आहेत.

संपामुळे त्यात आणखी भर पडणार असून संप मिटल्यानंतर फायलींचा निपटारा करण्यास विलंब लागणार आहे. संप सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी सायंकाळी वरील प्रमाणपत्रांचे 35 हजारांहून अधिक अर्ज तहसील कार्यालयांत पडून होते. त्यात दोन दिवसांत आणखी भर पडली आहे. एकूणच हा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर आला आहे. विद्यार्थ्यांच्या होणाºया परवडीबद्दल दिलगीर असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष डी. एम.
देशपांडे यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांसाठी तोडगा
संप सुरू असला तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यासाठी या मंडळींनी सहकार्य करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तहसीलदारांशी बोलून यातून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले. तसे झाल्यास सोमवारपासून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळू शकतील.