आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : अायुक्त म्हणतात, उघड्यावर बसणे 18 दिवसांत बंद करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात ७८०० स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट - Divya Marathi
शहरात ७८०० स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट
औरंगाबाद - केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा आढावा मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी शनिवारी घेतला. येत्या ३० ऑगस्टपर्यंत म्हणजेच १८ दिवसांत शहरात उघड्यावर शौचास बसवण्याचे प्रकार पूर्णपणे बंद झाले पाहिजेत, अशी सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. नेहमीप्रमाणे होकार दर्शवत अधिकाऱ्यांनी बैठकीत काही घडलेच नाही या अाविर्भावात बाहेरचा रस्ता धरला. 
 
कोणत्याही परिस्थितीत शहरात उघड्यावर शौचास बसणारे नागरिक दिसता कामा नयेत यासाठी बैठकीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला. गेल्या सात महिन्यांपासून मनपा पदाधिकाऱ्यांसह आयुक्त आणि अधिकाऱ्यांकडून उघड्यावर बसणाऱ्या व्यक्तींना गुलाबपुष्प देण्यासह पोलिस कारवाई करण्यात आली. मात्र प्रशासनाला यात पूर्णपणे यश आलेले नाही. बैठकीच्या सुरुवातीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकडेवारी सांगत कसे चांगले काम केले याचे दाखले दिले. आतापर्यंत शहरात ५००३ वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली. पालिकेने ७८०० स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऑगस्टअखेर पालिकेसमोर २७९७ वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्याचे आव्हान आहे. योजना राबविण्यात प्रशासकीय यंत्रणा हलगर्जीपणा करत असल्याचे लक्षात आल्याने मुगळीकर यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 
 
सेफ्टी टँक देणार 
शहराभोवतीच्या वसाहतींमध्ये पालिकेची ड्रेनेजलाइन पोहोचलेली नाही. अशा वसाहतीतील लाभार्थींना स्वच्छतागृहाच्या अनुदानासोबतच सेफ्टी टँक देण्याचे बैठकीत ठरले. याचा खर्च सीएसआरमधून केला जाणार आहे. त्यासाठी जलदगतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 
 
कारवाईचा इशारा 
बैठकीला काही स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अभियंता यांच्यासह अनेक अधिकारी गैरहजर होते. ते पाहून आयुक्त चांगलेच संतापले. गैरहजर अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांचाच त्यांनी समाचार घेतला. वरिष्ठांना याचे गांभीर्य नसल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला. 
 
शासनाने पाठवले पत्र 
मनपा प्रशासनाने वैयक्तिक शौचालयाचे काम पूर्ण करण्यासाठी घेतलेली मुदतवाढ संपण्यास अवघे १८ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शासनाने मनपाला पत्र पाठवून उद्दिष्ट पूर्ण करण्याची सूचना केल्याचे मुगळीकरांनी सांगितले. प्रशासकीय सुट्या वगळता हा दहा दिवसांचा कार्यक्रम असेल. वॉर्डावॉर्डांत जाऊन ज्यांनी आतापर्यंत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधलेले नाही त्यांना पालिकेची यंत्रणा योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. बैठकीस सर्व विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...