आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अवैध वाहतूक करताना पोलिसांनी पकडताच अँपेरिक्षाचालकाने दंड वाचवण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. वाहतूक पोलिसांनी त्याला तातडीने जीपमध्ये टाकून घाटीत दाखल केले. हे थरारनाट्य बुधवारी (5 फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता नगर नाक्यावर घडले.
अवैध वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांविरुद्ध नगर नाका येथे वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू होती. यात पोलिसांनी 130 रिक्षाचालकांवर कारवाई केली. अवैध प्रवासी वाहतूक करणारा एलपीजी रिक्षा (एमएच 20 बीटी 6943) पोलिसांनी पकडला. चालक सिकंदर कुरेशी (25, रा. पडेगाव) याने रिक्षा न सोडल्यास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची धमकी दिली. काही वेळातच कापडी पिशवीतील रॉकेलची बाटली अंगावर ओतून घेतली आणि पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिस आणि त्याच्यात बराच वेळ झटापट झाली. या प्रकारामुळे बराच काळ वाहतूकही खोळंबली होती. पोलिस उपनिरीक्षक पी. जी. ठाकरे व त्यांच्या सहकार्‍यांनी कुरेशीला पकडून घाटीत दाखल केले. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, आत्महत्येचा प्रयत्न व धमकी दिल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार अण्णासाहेब शेजवळ तपास करत आहेत.