आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती अधिकारात अर्ज करताही मिळेल इत्थंभूत माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माहिती अधिकार कायद्याच्या कलम अंतर्गत १७ मुद्द्यांची माहिती मोजक्याच शासकीय कार्यालयांनी आपापल्या संकेतस्थळांवर प्रदर्शित केली आहे. मात्र, जिल्हा परिषद, मनपासह अनेक कार्यालयांना याचा विसर पडलेला आहे. असे असताना शासनाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयाने याच्याही पुढे जात स्टेशनरीपासून ते मोजमाप पुस्तिकेपर्यंतची इत्थंभूत माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अर्जदारांना आता माहिती अधिकारामध्ये अर्ज करण्याची गरजच उरलेली नाही.
जागतिक बँक प्रकल्प कार्यलयाच्या कार्यकारी अभियंता म्हणून अरुंधती शर्मा यांनी सहा महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला. तेव्हापासूनच हे कार्यालय पेपरलेस करण्याबाबत त्यांनी नियोजनास सुरुवात केली. बऱ्याच शासकीय कार्यालयांमध्ये मोजमाप पुस्तिका किंवा देयके माहिती अधिकारामध्ये दिली जात नाहीत. त्यामुळे अर्जदाराला अपिलात जावे लागते, तरीदेखील मिळत नाहीत. मात्र, जागतिक बँक प्रकल्प कार्यालयाने प्रशासनाची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या मोजमाप पुस्तिका, देयकांसह इतर महत्त्वाची कागदपत्रे सहजपणे संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत.

स्टेशनरीपासून एमबीपर्यंत
संकेतस्थळावर विविध विभागांचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यात आले आहेत. त्यामध्ये बॅलेन्स शीट, वर्कऑर्डर, मोजमाप पुस्तिका, देयके, आश्रमशाळा प्रोग्रेस रिपोर्ट, कॅशबुक, बँक बुक, अधिकारी-कर्मचाऱ्यांची आस्थापनाविषयक माहिती, मासिक अहवाल, खरेदी प्रक्रिया, टेंडर नोटीस, भांडार इत्यादी माहितीचा समावेश आहे. प्रत्येक विभागाचा कर्मचारी चुकता ही माहिती अपलोड करतो.

सुखद सोमवार
कलम चारअंतर्गत १७ मुद्द्यांच्या माहितीसह आम्ही कार्यालयाची इत्थंभूत माहिती आमच्या विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. विशेष म्हणजे ती वेळोवेळी अपडेटही केली जाते. यामध्ये स्टेशनरीपासून ते एमबीपर्यंत सर्व प्रकारच्या माहितीचा समावेश आहे. यामुळे माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आम्हाला हे प्रमाण शून्यावर आणायचे आहे. अरुंधतीशर्मा, कार्यकारीअभियंता, जागतिक बँक प्रकल्प कार्यालय

असे जावे संकेतस्थळावर
महाराष्ट्रशासनाच्या www.mahapwd.com या संकेतस्थळावर pwd users वर क्लिक केल्यानंतर RTI Information आणि BOT Project Information हे ऑप्शन येईल. त्यावर गेल्यास कार्यालय, उपविभागाची निवड करत पाहिजे ती माहिती मिळवता येईल. ही संपूर्ण माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्ये देण्यात आली आहे. जसजशी कामे होतात, त्यानुसार डॉक्युमेंट्स अपलोड केले जातात.
काय आहे कलम ४?
स्वयंप्रेरणेने जाहीर करावयाच्या माहितीअंतर्गत १७ मुद्दे दिलेले आहेत. कुणीही माहिती अधिकारात विचारलेली ही माहिती म्हणजेच संबंधित कार्यालय-विभागाची ओळख जाहीर करणे होय. आपले कार्यालय कशासाठी आहे, कार्यक्षेत्र किती आहे, कार्यालयात कोणकोणती कामे केली जातात, जनतेसाठी सेवा-सुविधा इत्यादी माहिती त्यात समाविष्ट असावी. ही सर्व माहिती गरजेनुसार सूचना फलक, प्रसार माध्यमे, इंटरनेट, दवंडी इत्यादी माध्यमातून जाहीर करता येते. तसेच ती वेळोवेळी अद्ययावत करणेदेखील आवश्यक आहे. मात्र, बहुतांश कार्यालये ही माहिती जाहीर करत नाहीत. त्यामुळे १७ मुद्देच नव्हे तर कार्यालयातील कामकाजाची सर्वच माहिती संकेतस्थळावर अपलोड केल्याबद्दल जागतिक बँक प्रकल्प कार्यालय कौतुकास पात्र ठरते.
बातम्या आणखी आहेत...