आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात केवळ रिमझिम, अतिवृष्टीचा दावा पुन्हा फाेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी  अतिवृष्टी होण्याचा वेधशाळेने दिलेला इशारा रिमझिम बरसत पावसाने पुन्हा एकदा फोल ठरवला.  ८ जिल्ह्यातील ७६ पैकी एकाही तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही.  बीड जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात ३ मी मी पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. औरंगाबाद, हिंगोली, जालना  जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला खरा, परंतु रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा.
 
नांदेड, परभणी येथे सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली.  लातूर येथे दुपारनंतर पाऊस  झाला. हिंगोली जिल्ह्यात सायंकाळपर्यंत रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस  झाला. औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यातही असाच पाऊस झाला. डोंगरकडा, कनेरगाव नाका, खिल्लार-अडोळ, आखाडा बाळापूर या भागात मात्र चांगला पाऊस झाला.   
 
लातूरकरांना हवा पाऊस
लातूरला शनिवारी दुपारनंतर काही काळ फक्त रस्ता ओला होईल इतकाच रिमझिम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. सोयाबीन, मूग, उडीद अशी पिके पाण्याअभावी माना टाकीत आहेत. दोन दिवसांत जिल्ह्याच्या काही भागात तुरळक सरी कोसळल्या. शेतकरीही  मुसळधार पावसाकडे डोळे लावून बसले होते.  

उस्मानाबादसह येडशीत बरसला   
शनिवारी(दि.१९) सायंकाळी पाचच्या सुमारास  जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरासह येडशी भागात मध्यम तर अन्य भागात रिमझिम पाऊस झाला.  तुळजापूर, येडशी, परंडा, भूम, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, येरमाळा भागातही रिमझिम पाऊस झाला.   ज अधूनमधून रस्ते ओले होत होते. सायंकाळी पाचनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

हदगाव वगळता इतर तालुक्यात रिमझिम
वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी नांदेड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना उभारी मिळाली आहे. पावसाअभावी पिकेही सुकू लागली होती.  आकाशात  ढग जमा होत होते. प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी सकाळी १० पासून पावसाने  हजेरी लावली. सुरुवातीला रिमझिम पाऊस सुरू झाला. नंतर थोडा जोर वाढला आणि ओसरला. दुपारी चार वाजेपर्यंत रिमझिम मात्र सुरू होती.    

औरंगाबाद: सकाळपासून हलक्या सरी
जिल्ह्यात तब्बल ४० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाले. मात्र दमदार सरींऐवजी हलक्या सरी कोसळल्यामुळे आभाळाकडे नजरा खिळून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला.  शनिवारी सकाळपासून वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुलताबाद, गंगापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री परिसरात ढगाळ वातावरण होते. या तालुक्यांत हलका पाऊस झाला.
 
बातम्या आणखी आहेत...