आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगाकाबू पथक कॅमे-यांद्वारे ठेवणार समाजकंटकांवर नजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गर्दी, गोंधळ आणि दंगेखोरांना पकडण्यासाठी यापूर्वी डायगॅसचा वापर करण्यात येत होता. मात्र, डायगॅसवर दंगेखोरांनी उपाय शोधल्यामुळे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यांनी दंगा काबू पथकालाच व्हिडिओ कॅमेरे दिले आहेत. त्याद्वारे आता दंगेखोरांवर नजर ठेवली जाणार आहे.
या कॅमे-यांच्या वापरासाठी दंगा काबू पथकातील पोलिसांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जातीय दंगली, राजकीय आंदोलन, मोर्चे आणि शहरातील महत्त्वाच्या घडामोडी टिपण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील दंगा काबू पथकाला कॅमेरे देण्यात आले आहेत. दंगेखोरांना आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा केला जायचा. आता त्याच्या सोबतीला घडामोडी टिपण्यासाठी कॅमेरेही आले आहेत.
महिनाभरापूर्वी फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारी चित्रे प्रदर्शित झाल्यानंतर काही भागात तणाव निर्माण झाला होता. या जमावाने रात्रीपासून दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. या दंगेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. दंगल झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेच निदर्शनास येते. मात्र, दंगेखोरांनी पोलिसांवर केलेला हल्ला टिपला जात नव्हता. हा हल्ला टिपण्यासाठी आता दंगा काबू पथकाला कॅमेरे देण्यात आले आहेत. कॅमे-याद्वारे दिवसा आणि रात्री एक ते दीड किलोमीटरपर्यंत सहज चित्रीकरण करू शकेल तसेच आवाजाचे रेकॉर्डिंग शक्य होणार आहे. पोलिसांना सोनी कंपनीचे इंजिनियर सय्यद कलीम सय्यद रफिक प्रशिक्षण देत आहेत. यामुळे दंगेखोरांविरुद्ध सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.