आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - विवाह समारंभात डीजे लावण्यावरून दोन गटांमध्ये बेगमपुरा पोलिस ठाण्यासमोरच धुमश्चक्री झाली. त्यांच्या दगडफेकीत वाहने, घरांच्या काचा फुटल्या. शुक्रवारी (29 मार्च) रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे टाऊन हॉल परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
जयभीमनगर येथील जनार्दन भास्कर उगले यांचा रविवारी विवाह आहे. त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचे नातेवाईक बौद्ध विहारात जमले होते. डीजे लावून त्यावर नृत्यही सुरू होते. त्याचा आवाज टिपेला पोहोचला तेव्हा बौद्ध विहाराच्या मागे राहणार्या 50 नागरिकांचा जमाव तेथे आला. त्यांनी ताबडतोब आवाज बंद करा, असे सांगितले. त्याला उगले यांच्या नातेवाइकांनी विरोध केला असता जमावातील काही जणांनी त्यांच्यावर सिमेंट पेव्हिंग ब्लॉक भिरकावले. त्यामुळे हे लोक बाजूलाच असलेल्या पोलिस ठाण्यात पोहोचले. आशिष अशोक कांबळे (25, रा. जयभीमनगर) याने तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. तोपर्यंत दुसरा गटही तेथे येऊन पोहाचला आणि त्याने पुन्हा दगडफेक सुरू केली. तोपर्यंत उगले यांचेही आणखी नातेवाईक, जयभीमनगरातील रहिवासी आले होते. त्यांनीही दगडाला दगडाने प्रत्युत्तर दिले. पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. साडेदहाच्या सुमारास उपायुक्त जय जाधव, नरेश मेघराजानी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला पांगवले. दोन्ही गटांतील प्रमुख मंडळींना बौद्ध विहारात नेऊन त्यांना कडक शब्दांत समज दिली तरीही या भागातील तणावाचे वातावरण कायम होते.
लोकांची पळापळ : अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे टाऊन हॉल परिसरात लोक भेदरून गेले. कोणत्या दिशेने दगड येत आहेत आणि लोक आपल्यावर का हल्ला होत आहे हेच त्यांना कळत नव्हते. त्यामुळे ते पळत सुटले होते. अनेकांनी पुलाच्या पूर्वेकडील बाजूला पळ काढला, तर काहींनी इमारतींच्या संरक्षक भिंतीआड आसरा घेतला होता.
पोलिस पोहोचण्यास उशीर : दोन्ही गट परस्परांसमोर येऊन घोषणाबाजी करत असल्याचे काही सुजाण नागरिकांनी पाहिले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे लक्षात येताच त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फोन केला. पण तेथे कुणीही उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी कंट्रोल रूमला घटनेची माहिती देऊन पोलिसांची मोठी तुकडी पाठवा, अशी विनंतीही केली. मात्र, ती गांभीर्याने घेतली गेली नाही. जोरदार दगडफेक सुरू झाल्यावरच पथक पोहोचले. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
यांचे झाले नुकसान
शकील सिद्दिकी यांच्या एमएच 20 वाय 5144, मिर्झा समीर बेग (एमएच 11 बी 1822), नितीन कर्डक (एमएच 17 पी 1071) यांच्या कारच्या काचा दगडफेकीत फुटल्या.
‘आनंदनगर’ ला कायम त्रास
बेगमपुरा पोलिस ठाणे आनंदनगर सोसायटीच्या खुल्या जागेत आहे. या ठाण्याच्या हद्दीत दररोज दोन गटांमध्ये वाद, हाणामारीच्या घटना होतात. दोन्ही बाजूंचे तक्रारदार ठाण्यामध्ये येतात आणि ते येताना-जाताना शिवीगाळ करतात. त्यामुळे सोसायटीत राहणार्या लोकांची मानसिक शांतता धोक्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.