आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार घडताना फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका, आवाज उठवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समाजातील गुंडांना आपण विनाकारण घाबरतो. अत्याचार घडताना आत्मविश्वासाने आवाज उठवा, समोरचा गुंड घाबरल्याशिवाय राहत नाही. तो चुकीचा असतो याची त्याला जाणीव असते. त्यामुळे खऱ्या माणसाच्या कणखर आवाजात अत्याचार थांबवण्याची ताकद आहे, असे मत विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अॅड. िनकम पुढे म्हणाले, सध्याच्या हिंदी सिनेमांनी समाजाच्या भावना बोथट केल्या आहेत. वास्तवात घडू शकत नाही अशा घटना मालिका आणि सिनेमात दाखवतात. त्यामुळे तर्कशक्ती संपते. एखादा रेबीज झालेला कुत्रा जीभ बाहेर काढून पळत असतो त्याला बघून सगळे पळतात. म्हणून तो कुत्रा त्यांना चावतो. मात्र, एका जागी थांबून त्याला काठी दाखवण्याचे धैर्य करायला हवे. तसेच समाजाचे आहे. घडणाऱ्या वाईट घटनाना काठी दाखवता आली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणे म्हणजे देशसेवाच आहे असा सल्लाही निकम यांनी तरुणांना दिला. २६/११ चा हल्ला, मुंबई बॉम्बस्फोट, गुलशनकुमार हत्याकांड अशा अनेक खटल्याचे अनुभव या वेळी निकम यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष आणि पंडित दीनदयाल उपाध्याय संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. उपमहापौर प्रमोद राठोड, देवजीभाई पटेल, पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे, मनोज गांगवे, शाळचे मुख्याध्यापक देवतळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आशिष नावंदर, मालती करंदीकर, बच्चू पटेल, दिलीप थोरात यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला धर्मवीर संभाजी विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बाभूळगावकर यांनी केले.
पोलिसांनी सौजन्य शिकावे
तुमच्याकडे आलेल्या सामान्य नागरिकांशी तुम्ही कसे बोलता, यावर तुमची प्रतिमा अवलंबून असते. मात्र, पोलिसांकडून सौजन्याच्या वागणुकीचे उदाहरण पाहायला मिळत नाही. पोलिसांना खऱ्या अर्थाने समाजात बदल घडवायचा असेल, तर नागरिकांशी त्यांचे संबंध अधिक सौजन्याचे असायला हवेत, असा टोलाही त्यांनी शहर पोलिसांना लगावला.

मला वकील व्हायचे नव्हते
कसाबसारख्या अतिरेक्याला फासावर लटकावणारे, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी गजाआड करणारे आणि आतापर्यंत ज्यांच्या प्रतिवादामुळे ३७ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि २८ गुन्हेगार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी मला वकील व्हायचे नव्हते असे सांगितल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. माझ्या आईला वाटत होते की मी डॉक्टर व्हावे, तर वडिलांना वाटत होते वकील व्हावे. मात्र, दोन टक्क्यांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला नंबर लागला नाही म्हणून वकील झालो. भल्याभल्यांची बोलती बंद करणारे निकम यांनी त्यांनी लिहिलेल्या प्रेम कविता सादर करून तरुणांची मने जिंकली. राजकारण, समाजकारण आणि प्रशासनाच्या चंागल्या-वाईट गोष्टींवर भाष्य करत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.
बातम्या आणखी आहेत...