आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरिबीशी लढणाऱ्यांचे अनुभव ऐकून हेलावलो : रितेश देशमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रतिज्ञेत आपण भारत हा वैविध्याने नटलेला देश असल्याचे म्हणतो. ते खरे असले तरी भारतीय समाजात कमालीची तफावत आहे, याची प्रचिती मला ‘विकता का उत्तर’ या रिअॅलिटी शोचे अँकरिंग करताना येत आहे. भारतातील गरिबीची मला कल्पना आहे; पण जेव्हा त्याचा माझ्याशी सामना झाला तेव्हा मन हेलावून गेले. या शोमुळे खूप काही शिकायला मिळत आहे. आयुष्याचे विविध रंग जगण्याचा हा अनुभव येत आहे, अशा शब्दांत प्रख्यात अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
‘विकता का उत्तर’ या शोच्या माध्यमातून ऑक्टोबरपासून छोट्या पडद्यावर त्याचे आगमन झाले आहे. यानिमित्ताने ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला दिलेल्या खास मुलाखतीत तो म्हणाला की, मुंबईत शिक्षण झाले असले तरी गावाकडे म्हणजे लातूरला (बाभळगाव) सतत जाणे व्हायचे. त्यामुळे माझी ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे, पण ५२ भागांचे चित्रीकरण करताना मी ग्रामीण संस्कृतीतील खूप वेगवेगळ्या अनुभवांना सामोरा जात आहे. यातील एका भागात सहभागी झालेल्या महिलेने नवऱ्यासाठी गाडी घेण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते.

हॉटसीटवर बसल्यावरही तिने हीच इच्छा व्यक्त केली. खेळातील एका टप्प्यावर जिथे तिला एक चांगली रक्कम मिळणार होती तिथे ती दुर्दैवाने खेळाबाहेर झाली. अन्् तोपर्यंत जिंकलेली सर्व रक्कम तिला सोडून जावी लागणार होती. स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे लक्षात येताच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मी विचारले तेव्हा तिने स्कूटी घ्यायची होती, असे म्हटले आणि आम्हा सर्वांचेच डोळे पाणावले. कारण आम्ही समजत होतो की तिला कार घ्यायची असणार. एखाद्या कुटुंबात स्कूटी घेणे इतके दुरापास्त असू शकते किंवा स्कूटी खरेदी हे सर्वात मोठे स्वप्न असू शकते. ही बाब आम्हाला हेलावून गेली. नंतर मी तिला स्कूटी खरेदी करून दिली.

रितेश म्हणाला की, या खेळात लोक पैसे जिंकण्यासाठी येतात, पण त्यांच्या जीवनातील अनुभव मला समृद्ध करत आहे. पुढील काळात निशिकांत कामत दिग्दर्शित माउली आणि रवी जाधव यांच्यासोबतचा एक चित्रपट लवकरच येत असल्याची माहितीही त्याने दिली.
बातम्या आणखी आहेत...