आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इस शहर का भगवान ही मालिक’; ‘गोंधळ घालाल तर आम्हीही तयार आहोत’- पोलिस आयुक्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -मुंबई एटीएसने छळ केल्यामुळे मिर्झा रिझवान बेग याने आत्महत्या केली, असा ठपका ठेवून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देणार्‍यांना पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सोमवारी (आठ एप्रिल) खडे बोल सुनावले. तणाव निर्माण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार्‍यांना आयुक्त म्हणाले,

‘गोंधळ घालण्याचा प्रयत्न कराल, तर आम्हीदेखील तयार आहोत.’ शहरातील काही संघटना दबावतंत्राचा वापर करीत अधिकार्‍यांसोबत सर्वसामान्यांचेही ब्लड प्रेशर आणि शुगर वाढवण्याचे काम करीत आहेत. त्यांना आवरण्यासाठी एकही सुजाण नेता शहरात नसल्याने इस शहर का भगवान ही मालिक आहे.’
पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदार रिझवान बेगने रविवारी (7 एप्रिल) सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी माहिती मिळताच काही भागात तणाव निर्माण झाला होता. आज सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास टाइम्स कॉलनीतील उस्मानिया मशिदीत मुस्लिम संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत एटीएसच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी मंगळवारी शहर बंदचे आवाहनही करण्यात आले होते. बैठकीनंतर दुपारी दीडच्या सुमारास मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलचे कर्नल नेहरी, आवेज अहमद, एमआयएमचे जावेद कुरेशी यांच्यासह मौलाना नईम मुफ्ती, मौलाना अब्दुल रशीद मदनी, अश्फाक सलामी, रशीदमामू, मोहसीन पहेलवान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्या वेळी आयुक्तालयात बंदोबस्त वाढवण्यात आला होता. दरम्यान, रिझवानवर रात्री साडेआठ वाजता रोजाबागेतील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी शुक्रवारी (12 एप्रिल) दुपारी दोन वाजता जामा मशिदीपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय सायंकाळी घेण्यात आला आहे.
संतापलेले आवाज झाले शांत
एटीएसने अन्याय केला
रिझवानच्या मृत्यूला एटीएसचे अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी कोणत्याही चौकशीविना केलेल्या अन्यायाला कंटाळूनच रिझवानने आत्महत्या केली.
दडपशाही सुरू आहे
संपूर्ण प्रकरणात पोलिस यंत्रणेची दडपशाही सुरू आहे. एका निष्पाप युवकाचा बळी गेल्यानंतर त्याची दखल घेण्याची तयारी दाखवली जात नाही.
काय म्हणाले आयुक्त
तर मुंबईत गुन्हा दाखल करा
एटीएसच्या अधिकार्‍यांनी रिझवानला त्रास दिला. त्याच्यावर अन्याय केला, असे तुमचे म्हणणे असेल तर त्या अधिकार्‍यांवर तुम्ही मुंबईत गुन्हा दाखल करा.
तुम्ही कशाला आलात ?
मी रिझवानच्या भावाला बोलावले होते. तुम्ही एवढे सगळे कशाला आलात? रिझवान मनोरुग्ण होता की नाही, याची मला खात्री करून घ्यायची होती.