आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Accident In Aurangabad Because Of Headphone

हेडफोनने घेतला दोघांचा जीव; ट्रकने चिरडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळूवरून दुचाकी घसरली आणि पाठीमागून येणारा ट्रक त्यांच्यावरून गेल्याने दोघांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना शुक्रवारी (26 जुलै) सकाळी नऊ वाजता बीड बायपास रोडवरील सतरंज ट्रान्सपोर्टसमोर घडली. प्रशांत भाऊसाहेब बचके (21, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) आणि रामेश्वर शेषराव नागरे (22, रा. शिवपुरी कॉलनी, पडेगाव) अशी मृतांची नावे आहेत.

पडेगाव येथील रामेश्वर आणि प्रशांत दोघेही प्लंबिंगचे काम करत. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता रामेश्वर (एमएच 20 सीएम 3902) दुचाकीवर प्रशांतकडे आला. जेवणाचा डबा घेऊन दोघेही प्लंबिंगच्या कामासाठी रेल्वेस्टेशनमार्गे बीड बायपासकडे निघाले. दुचाकी चालवत असताना रामेश्वर आणि प्रशांत या दोघांनीही कानाला मोबाइलचे हेडफोन लावलेले होते. मोबाइलमधील गाणी ऐकत रामेश्वर दुचाकी चालवत होता. सतरंज ट्रान्सपोर्टसमोर त्यांची दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले.

दरम्यान, पाठीमागून येणारा भंगारचा ट्रक (एमएच 21 5532) त्यांच्या डोक्यावरून गेला आणि त्यांचा जागीच अंत झाला. दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते. अपघात घडताच ट्रकचालक पसार झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, दोघांचेही मेंदू बाहेर पडले होते. रस्त्यावर अक्षरश: रक्ताचे थारोळे साचले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी स्वाभिमान सेनेचे शहर उपाध्यक्ष फिरोज खान यांनी दिली. अपघाताची माहिती फिरोज खान, मोहंमद इर्शाद शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी सातारा पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक अनिल काचमांडे, प्रल्हाद जाधव, हरिश्चंद्र लांडे पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह घाटीत हलवले.

दुचाकीवरून जाताना रामेश्वर आणि प्रशांत दोघेही नेहमीच हेडफोन लावून गाणी ऐकत असत. दुचाकीवर असताना हेडफोनचा वापर करू नका, असे त्यांना अनेकदा मित्रांनी समजावून सांगितले. पण त्यांनी मित्रांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. दुचाकी घसरल्यानंतर दोघेही रस्त्यावर पडले. मागून येणारा ट्रकचालक जोरजोरात हॉर्न वाजवत होता, पण दोघांनीही हेडफोन लावल्यामुळे त्यांना हॉर्नचा आवाज ऐकू आला नाही आणि ट्रक त्यांच्या अंगावरून गेला, असे काही प्रत्यक्षदर्शींनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

स्वाभिमान सेनेची मागणी
बीड बायपास रोडवरून दररोज हजारो जड वाहनांची वर्दळ असते. महानुभाव चौक ते शहानगरदरम्यानच्या रस्त्यावर व्यापारी, गॅरेजमालक आणि वाळू विक्रेते आपली वाहने उभी करतात. त्यामुळे 200 फुटांचा हा रस्ता 40 फुटांचा झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणार्‍या वाहनांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमान सेनेने आठ मे रोजी पोलिस आयुक्तांना दिले आहे. दरम्यान, रामेश्वर हा समोरुन जाणार्‍या एका ट्रकला ओव्हरटेक करत होता. या ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने दोघेही खाली पडले. यानंतर पाठीमागून आलेल्या ट्रकने दोघांना चिरडल्याची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे यांनी दिली.