आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: ट्रकने 3 वर्षीय मुलीला चिरडले, आईच्या पायांवरुन गेला ट्रक, वडिलांची मृत्यूशी झुंज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आधी सिग्नल तोडले आणि पुढे जाऊन मोटारसायकलवर जाणाऱ्या कुटुंबाला चिरडले. यात तीन वर्षांच्या चिमुकलीचा बळी गेला तर तिचे आईवडील गंभीर जखमी झाले. आईचे पाय निकामी झाले असून वडीलही मृत्यूशी झुंज देत आहेत.
 
 
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एमआयटी महाविद्यालयाच्या चौकात ही हृदयद्रावक घटना घडली. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकाला नागरिकांनी चोप देऊन सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोही ऊर्फ राणी अंबादास खिल्लारे (३) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील अंबादास खिल्लारे (२७) आई ऊर्मिला खिल्लारे (२५) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अंबादास खिल्लारे हे पत्नी ऊर्मिला चिमुकल्या आरोहीसोबत सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहानूरमियाँ दर्गा येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी जात होते. अंबादास यांनी पाचच्या सुमारास शेजारीच राहणारे सासरे खाजेकर यांची दुचाकी (एमएच २० बीयू ८३३२) घेतली. ते एमआयटी महाविद्यालय चौकातून शहरात येण्यासाठी निघाले. एमआयटी महाविद्यालयात सिग्नल लागल्याने खिल्लारे थांबले. याच वेळी संग्रामनगर चौकातून महानुभाव आश्रमाच्या दिशेने वाळू नेणारा हायवा ट्रक (एमएच २० सीटी ७१४१) भरधावपणे आला. चालक भाऊसाहेब एकनाथ खडसण (४०, रा. पिंपळगाव, ता. पैठण ) याचा सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नात त्याने सातारा गावाच्या कमानीखाली उभ्या असलेल्या खिल्लारे यांच्या दुचाकीला ठोकरले. या धडकेत आरोहीच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर हायवाचे मागील चाक ऊर्मिला यांच्या पायावरून गेले. धडकेत अंबादास हेही गंभीर जखमी झाले.
 
 
पती-पत्नीला तत्काळ बीड बायपासवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आरोहीचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत खिल्लारे दांपत्याची प्रकृती गंभीर होती. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या हायवा चालक भाऊसाहेब खडसणला नागरिकांनी पकडून चोप देत सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. 

सिग्नल तोडला, अपघात झाला 
खिल्लारेबीड बायपासमार्गे शहानूरमियाँ दर्गा येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी निघाले होते. ते एमआयटी चौकात सिग्नल लागल्याने गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कमानीखाली थांबले. या वेळी महानुभाव आश्रमाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल लागला होता. 

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या दिशेने महानुभाव आश्रमाकडे जाणारा ट्रकही सिग्नलवर थांबला. परंतु घाईत निघण्याचा प्रयत्न करीत ट्रकचालकाने रस्त्याच्या खालून सर्व वाहनांना मागे टाकत सिग्नल तोडून जाण्याचा प्रयत्न केला. पुढे जाण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट कमानीखाली उभे खिल्लारे यांच्या दुचाकीला चिरडून पुढे गेला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथून दुपारी वाजून १३ मिनिटांनी या ट्रकमध्ये वाळू भरण्यात आली होती. काही मिनिटांच्या घाईमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

पाच वर्षांपूर्वी झाले लग्न 
खिल्लारे हे मिस्त्री असून सध्या ते एका कंत्राटदाराकडे फरशी बसवण्याचे काम करत होते. पाच वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. फुलंब्री तालुक्यातील जयतखेडा हे त्यांचे मूळ गाव आहे. पत्नी मुलीसह ते सातारा गावातील मनपा वॉर्ड कार्यालयाजवळ राहतात. 

रस्त्यावर बॅरिकेड्स नाहीत 
सातारा गावातून निघाल्यावर एमआयटी चौकात येईपर्यंत एकपदरी छोटा रस्ता आहे. महाविद्यालयासमोर दुभाजक किंवा बॅरिकेड्स नाहीत. त्यामुळे तिन्ही दिशेने जाणाऱ्या दुचाकींची रस्त्यावर गर्दी होते. तसेच रस्त्यावर मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहने थेट बीड बायपासला चिकटून उभी राहतात. 

अजून किती जीव घेणार ? 
वाळू वाहणाऱ्या वाहनांमुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आठ दिवसांपूर्वीच बेगमपुरा परिसरात वाळूच्या वाहनाने तीन वर्षांच्या मुलीला चिरडले. जयभवानीनगरमध्ये एका महिलेचे वाळूच्या ट्रकने पाय चिरडले होते. या महिलेचा तीन महिन्यांनंतर मृत्यू झाला. ही वाहने अजून किती जीव घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...