आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डय़ाने घेतला अभियंत्याचा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक वळण घेतल्याने विजय मदन म्हस्के (27) या तरुणाची भरधाव दुचाकी विद्युत खांबावर आदळली. यात विजयच्या जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (27 जून) चिश्तिया चौकाच्या अलीकडील रिलायन्स फ्रेश मॉलसमोर रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. विजयच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला.

सिडको परिसरात तीन मित्रांसह राहणारा विजय चिकलठाणा एमआयडीसीतील लोंबार्डिल कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होता. तो सात वर्षांपूर्वी बीड तालुक्यातील पालवण येथून कामाच्या शोधात शहरात आला होता. गुरुवारी रात्री तो एका मित्राच्या घरी गेला होता. तेथून दुचाकीवर (एमएच-20-बीव्ही-5165) घराकडे जात होता. त्या वेळी हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर चिश्तिया चौकीतील पोलिस व काही रिक्षाचालकांनी त्याला तातडीने घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सिडको पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी मृतदेह नातेवाईक गावी घेऊन गेले आहे. सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार क रण्यात आले. घरची परिस्थिती अन् शिक्षणाची कास नसतानाही उच्च शिक्षण मिळवून कुटुंबाचा विकास करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. नोकरी करत शिक्षण घेऊन आयुष्य घडवण्याचे बळ पंखांमध्ये साठवत असतानाच विजयवर काळाने घाला घातला. आयुष्यभराची ठरवलेली स्वप्ने क्षणार्धात मोडून पडले.

घाटीत दाखल केले
अपघात झालेल्या तरुणाने मद्यप्राशन केलेले नव्हते. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. एस. आर. वाघ, सहायक उपनिरीक्षक

खांबावर धडकल्याचा आवाज झाला
पावणेबारा वाजेच्या सुमारास खांबाला धडकल्याचा आवाज आला. मी आणि माझे सहकारी घटनास्थळी धावलो. तोपर्यंत चिश्तिया पोलिस चौकीतून पोलिसही मदतीला धावले. त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दुभाजकावर रक्ताचा सडा पडला होता. शिवकु मार जैस्वाल, प्रत्यक्षदर्शी.

हेल्मेट वापरण्याची सूचना
हेल्मेट वापरण्याच्या सूचना आहेत. मात्र, तशी सक्ती नाही. मी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात येणार्‍या-जाणार्‍या दुचाकीस्वारांना मात्र हेल्मेट सक्ती केलेली आहे. संजयकुमार, पोलिस आयुक्त.