आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-दुचाकी अपघातात तरुणाचा अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बीड बायपास रोडवरील कासलीवाल मार्वलजवळ कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीस्वार हुसेन मेहताब पठाण (21) याचा जागीच मृत्यू झाला, तर शेख जाकेर शेख अख्तर (26, दोघेही रा. डोणगाव, ता. अंबड) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.

अपघातातील मृत हुसेन हा मजुरी करायचा. कोलकात्याला काम मिळाल्याने तो शेख जाकेर या मित्रासोबत रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी हीरो होंडा दुचाकीवर (एमएच 20 एडी 7253) रेल्वेस्टेशनकडे जात होता. त्यांची दुचाकी कासलीवाल मार्वलजवळील रस्त्यासमोरून जात असताना स्कोडा कार (एमएच 20 सीएच 7933) आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात हुसेन रस्त्यावर दूरवर फेकला गेला, तर शेख जाकेर हा दुभाजकावर आदळला. हुसेनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याचदरम्यान बीडच्या दिशेने जाणार्‍या ट्रकच्या (एचआर 73 3256) चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ ब्रेक लावल्याने पुढील अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शेख जाकेरला तत्काळ घाटीत हलवले. या अपघातात जाकेरच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद खर्चे स्कोडा कार चालवत होते. मृत हुसेनच्या पश्चात सात बहिणी व एक भाऊ आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.