आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न समारंभाहून परतताना ट्रकने चिरडले; मामा-भाच्याचा अंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पैठण रोडवरील इटखेड्यात लग्न समारंभ आटोपून खुलताबादच्या दिशेने निघालेल्या मामा-भाच्याच्या दुचाकीला रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शरणापूरजवळील अँम्बेसी हॉटेलसमोर कापसाने भरलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. यात सचिन अंबादास घाटे (19, रा. मावसाळा, खुलताबाद) आणि बाबासाहेब जनार्दन मोरे (22, रा. गुंजाळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे तब्बल अर्धा तास रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

मजुरीकाम करणारे सचिन आणि त्याचा मामा बाबासाहेब हे दोघे रविवारी दुपारी इटखेडा येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी दुचाकीवर (एमएच 20 8014) आले होते. दुपारी लग्न समारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास ते इटखेडा येथून खुलताबादला जाण्यासाठी निघाले. या वेळी सचिन दुचाकी चालवत होता. एका वाहनाला ओव्हरटेक करताना सचिनची दुचाकी समोरून येणार्‍या कापसाच्या ट्रकला (आरजे 19 जीबी 3466) धडकली. भरधाव ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने दोघांच्या डोक्यावरून चाक गेले. हा भीषण अपघात घडताच संतप्त जमाव ट्रकचालकावर चालून गेला. मात्र, चालकाने ट्रक वळवत तो पेट्रोल पंपासमोर लावला. जमावाने चालकाचा पाठलाग करत त्याला ट्रकमधून खाली खेचले. मारहाण सुरू असतानाच ट्रकचालकाने जमावातून स्वत:ची सुटका करून घेतली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घाटीत नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.