आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते महामंडळ बसवणार सर्व उड्डाणपुलांवर जाळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘दिव्य मराठी’ने कैलासनगरचा रस्ता, खड्डे बुजवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा आणि सर्व उड्डाणपुलांवर संरक्षक जाळ्या, रिफ्लेक्टर लावण्यासंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध केलेले वृत्त आणि भूमिकेवर औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. उड्डाणपुलांवर जीवघेणे अपघात टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळ संरक्षक जाळ्या, रिफ्लेक्टर बसवण्याची कामे करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी शपथपत्राद्वारे सांगितले, तर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करणे सुरू असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र, दीड वर्षापूर्वी औरंगाबाद - पैठण रस्त्याविषयी दाखल केलेल्या शपथपत्रावरून विभागाने घूमजाव केले. तेव्हा अवमान नोटीस का बजावू नये, अशी विचारणा न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, एआयएस चिमा यांनी केली.
शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पार्टी इन पर्सन अॅड. रूपेश जैस्वाल यांनी २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यातील सुनावणीत खंडपीठाने उड्डाणपुलांवरील कामांची जबाबदारी घेण्यास मनपा, रस्ते विकास महामंडळ टाळाटाळ करत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली गाडेकर यांनी शपथपत्र दाखल केले. मोंढा नाका, सेव्हन हिल्स संग्रामनगर येथील उड्डाणपुलांवर संरक्षक जाळ्या रिफ्लेक्टर बसवण्याचे काम देण्यात आले असून क्रांती चौकचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. नियोजित महावीर चौक सिडको येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथेही संबंधित बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

मनपातर्फे शपथपत्र दाखल : मनपाचेकार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली यांनी मनपातर्फे शपथपत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक वर्षी निविदा काढावी लागल्याने मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता, परंतु जानेवारी रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत हॉटमिक्स हॉटलेडचा प्लॅन घेणार असल्याचा ठराव घेण्यात आला.
ऐतिहासिक दरवाजांच्या दोन्ही बाजूला रस्ते बनवण्याचा प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला आहे. गुलमंडी, पानदरिबा, कटकट गेट आदी ठिकाणी अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. क्रांती चौक-रेल्वेस्टेशन रस्ता रुंदीकरणात रेल्वेच्या जमिनीमुळे प्रक्रिया रखडली आहे. रेल्वे विभागाला उपरोक्त जमिनीपोटी साडेतीन कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे शपथपत्रात सांगितले. वाहतूक नियमन सल्लागार समिती बनवण्यासंबंधी यापूर्वी पोलिस आयुक्तांतर्फे सांगण्यात आले होते. यावरही मनपाने अनुकूलता दर्शवली. उपरोक्त दोन्ही शपथपत्रांवर उत्तर देण्यासाठी पार्टी इन पर्सन याचिकाकर्ते अॅड. रूपेश जैस्वाल यांनी वेळ मागून घेतली. याचिकेत मनपातर्फे अॅड. राजेंद्र देशमुख, शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे अॅड. श्रीकांत अदवंत यांनी काम पाहिले.

कैलासनगर रस्त्यासाठी भूसंपादन
जालनारस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कैलासनगर-एमजीएम रस्ता करावा, यासाठी ‘दिव्य मराठी’ने सहकारातून समस्यामुक्ती अभियानांतर्गत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या महिन्यातील शपथपत्रात मनपाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे म्हटले होते. बुधवारी मनपाने दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, भूसंपादनातील अडथळे दूर करून या रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रक्रिया गतिमान केली जाईल.

मनपाचा भुयारी मार्गासाठी होकार
शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची काेंडी होते. उपरोक्त जागी भुयारी मार्ग करण्यासंबंधी रस्ते विकास महामंडळाने भुयारी मार्गाचा पर्याय दिला होता. यासंबंधी मनपाच्या वतीने राज्य रस्ते महामंडळास ना हरकत प्रमाणपत्र बहाल केल्याचे शपथपत्रात नमूद केले.

टोल अभावी काम रखडले
आैरंगाबाद-पैठणया ४८ किमी रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी सा. बां. विभाग करेल, असे शपथपत्र सादर केले होते. परंतु बुधवारी हे काम केंद्र सरकार करेल, असे सांगण्यात आले. तांत्रिक कारणामुळे सा. बां. विभाग काम करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. यावर खंडपीठाने अवमान नोटीस का बजावू नये? अशी विचारणा केली.

बायपासचे काम पूर्ण करणार
शरणापूर ते साजापूर या साडेचार किमी बायपास रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल. केंब्रिज, जालना रोड ते हर्सूलसावंगी येथील १३ किमी बायपासपैकी किमीपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण केले जाईल, असेही शपथपत्रात म्हटले आहे.