आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत रस्त्यांची दहशत: आता उरले फक्त रस्त्याचे अवशेष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एखादी चांगली योजना आणली तर ती पुढे तशीच चांगली सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले नाहीत तर काय होते, याचा उत्तम नमुना म्हणजे बाबा पेट्रोल पंप ते मिलकॉर्नर रस्ता होय. 10 वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या मदतीने तयार केलेल्या एका उत्तम रस्त्याची मनपाने देखभाल न केल्याने अक्षरश: माती झाली आहे. परगावाहून औरंगाबादेत प्रवेश करणार्‍यांना महाभयानक खड्डय़ांतून जाताना शहराची काय वाट लागली आहे, ते लक्षात येते.

औरंगाबाद शहर हे मराठवाड्याची राजधानी असल्याने येथील रस्ते चांगले व्हावेत यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शहरासाठी एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प राबवला होता. 163 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील 3 कोटी रुपये खर्चून रेल्वेस्टेशन ते दिल्ली गेट हा रस्ता तयार करण्यात आला. 2003 मध्ये हा रस्ता तयार झाला आणि मनपा जणू ती आपली जबाबदारी नाहीच असे समजून विसरून गेली. चिल्लर पॅचवर्क वगळता न कधी रस्त्याची मजबुतीकरण केले गेले ना देखभाल. रोज किमान 25 हजार वाहनांची वर्दळ असणार्‍या या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली. बाबा पेट्रोल पंप ते मिलकॉर्नर या मार्गावर रस्त्याचे अवशेष उरले आहेत, असेच म्हणावे लागते.

खड्डय़ांनी सलामी : बाबा पेट्रोल पंप हे शहराचे प्रवेशद्वार आहे. पहिल्या घासाला खडा लागावा तसा पहिल्या पावलाला खड्डा लागतो आणि पुढच्या खड्डय़ांतून वाट काढताना जीव मेटाकुटीला येतो. या रस्त्यावरूनच शहराची काय अवस्था असेल याची कल्पना येते.
बाबा पेट्रोलपंप ते बसस्थानक हा मार्ग तर सर्वात वाईट बनला आहे. सिद्धार्थ उद्यानाजवळच्या पुलावरदेखील मोठे खड्डे झाले आहेत. बसस्थानकासमोर आणि पुढे मिलकॉर्नर चौकात रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला तीच स्थिती आहे. एसटी वर्कशॉपच्या बाजूने पाइपलाइनसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्ता पूर्ण खराब झाला आहे.

निकृष्ट पॅचवर्क : सर्मथनगरचे समीर राजूरकर, गरमपाणीचे विजयेंद्र जाधव आणि नागेश्वरवाडीच्या कीर्ती शिंदे अशा तीन नगरसेवकांच्या वॉर्डांत हा रस्ता येतो. खराब रस्त्याबाबत फक्त निवेदने देण्यापलीकडे कुणी फार प्रयत्न केले नाहीत. दुरुस्तीच्या नावाखाली पॅचवर्क केले जाते. प्रचंड वाहतूक असणारा रस्ता असल्याने येथे शास्त्रशुद्ध प्रकारे खड्डे बुजवणे आवश्यक असताना नुसते बुजवण्याचे काम केले जाते. तीन महिन्यांपूर्वीच या मार्गावर पॅचवर्क केले होते हे सांगितल्याशिवाय खरे वाटणार नाही.

प्रचंड वाहतूक : या रस्त्यावर मध्यवर्ती बसस्थानक आहे. तेथे दिवसाला 10 हजार बसफेर्‍या होतात. शिवाय प्रवासी वाहतूक करणार्‍या काळ्या पिवळ्या, ऑटो रिक्षा, कामगारांची वाहतूक करणार्‍या बसेस, शहर वाहतुकीच्या बसेस, कार, दुचाकी अशा सगळ्या प्रकारच्या वाहनांची दिवसांतले 20 तास ये-जा सुरू असते. या रस्त्यावरून दररोज अंदाजे 25 हजार वाहने जात असतात.