आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यांची दहशत: ठिगळपट्टीवर पाच वर्षांत 15 कोटींची उधळपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या 8 ते 10 वर्षांत नव्याने रस्ते केले नाहीत, जे आहेत त्यांची देखभाल नाही, अशा अवस्थेत गेलेल्या शहरातील रस्त्यांच्या ठिगळपट्टीवर मात्र गेल्या पाच वर्षांत 15 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उधळपट्टी मनपाने केली. एवढे असूनही नागरिकांच्या नशिबी फक्त खड्डेच आले आहेत.

‘दिव्य मराठी’ने चालवलेल्या ‘रस्त्यांची दहशत’ या मालिकेतून मनपाचे रस्त्याबाबतचे धोरण किती उदासीन आणि पोकळ आहे हे दिसून आले. शहरातील 1400 किमीच्या रस्त्यांपैकी चार-दोन रस्ते सोडले तर सर्वांचीच चाळणी झाली आहे. या रस्त्यांबाबत माहिती घेतली असता बहुतेक रस्ते गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी तयार केले आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की, या रस्त्यांच्या पॅचवर्कच्या नावाखाली गेल्या आठ ते दहा वर्षांत मनपाने भरपूर उधळपट्टी केली.

दरवर्षी किमान तीन कोटी : पॅचवर्क या गोंडस नावाखाली खड्डे बुजवण्याचे काम दरवर्षी नेमाने हाती घेतले जाते. पॅचवर्कशिवाय रस्त्यांची एरवी कधी देखभाल केली जात नाही. रस्ता तयार केल्यानंतर किमान तीन वर्षे त्याची देखभाल कंत्राटदाराने करावी,असे असताना ते कधीही फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. या देखभालीत डांबराचा थर देऊन रस्त्याचा पृष्ठभाग मजबूत करणे अपेक्षित असते; पण ते झालेले नाही. मूळ रस्ता तयार करतानाच शहरात एकाही जुन्या रस्त्यावर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने रस्ते लवकर खराब होतात. परिणामी पॅचवर्कची कामे अधिक निघतात. दरवर्षी किमान तीन कोटी रुपये पॅचवर्कवर खर्च केलेच जातात. याचाच अर्थ गेल्या पाच वर्षांत मनपाने पॅचवर्कवर 15 कोटी रुपये उधळले आहेत. या पैशांचा हिशेब ना कधी विचारला जातो ना त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे पॅचवर्कचे गौडबंगाल वाढत चालले आहे.

मोजमाप पुस्तिका गायब
‘दिव्य मराठी’च्या मालिकेनंतर शहरात मागील वर्षी करण्यात आलेल्या पॅचवर्कची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे काम 25 दिवसांपासून थांबलेले आहे. त्याला कारण या कामांच्या मोजमाप पुस्तिका मिळाल्या नाहीत. या मोजमाप पुस्तिकांमध्ये केलेल्या कामांचा सगळा तपशील असतो. काय काम केले, कुठे केले, कसे केले, मटेरियल किती आणि कोणते वापरले हे सारे यात नमूद असते. त्यानंतरच कंत्राटदारांची बिले निघतात. चौकशी समितीला या मोजमाप पुस्तिकाच मिळत नसल्याने सत्य स्थिती आणि केलेले गौडबंगाल समोर येणार नाही. समितीचे सदस्य जगदीश सिद्ध यांनी मोजमाप पुस्तिका मिळत नसल्याने या कामांबाबत संशय निर्माण होण्यासारखी स्थिती असल्याचे म्हटले आहे. समितीने केलेल्या पहिल्या पाहणी दौर्‍यात पॅचवर्कचे भयंकर काम समोर आले होते.

महिनाभरात उखडले पॅचवर्क
पॅचवर्कची कामे शास्त्रशुद्ध प्रकारे न केल्याने तात्पुरते खड्डे बुजतात, पण लगेच उखडतात. महिनाभरात पॅचवर्क उखडल्याची शेकडो उदाहरणे आहेत. या संदर्भात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिव्याख्याता डॉ. आर. एम. दमगीर यांनी इंडियन रोड काँग्रेसच्या निर्देशानुसार पॅचवर्क करताना खड्डे चौकोनी करून ते बुजवावेत, असे सांगितले. तसे काम आजपर्यंत कुणीच केले नाही याची कबुली मनपाच्या पदाधिकारी अधिकार्‍यांनी दिली. यापुढे आयआरसीचे नियम पाळू, असे आता ते म्हणत आहेत.