आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीगिरी:औरंगाबादेत महापौर बंगल्यासमोर अभिनव आंदोलन; रस्ता झाडला, फुलेही अंथरली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-प्रचंड खड्डे आणि अफाट धूळ अशा अवस्थेत दिवस काढणार्‍या शहरवासीयांचा संयम आता संपत आहे. सोमवारी ‘इको नीड्स फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी महापौर कला ओझा यांच्या निवासस्थानासमोरचा रस्ता झाडून लख्ख करीत फुले अंथरली. ‘तुम्ही जा फुलांवरून, आम्ही जातो खड्डय़ांतून’,‘तुम्ही जा एसीतून, आम्ही जातो धुळीतून’ असे आवाहन करीत त्यांनी गांधीगिरी केली.

1400 किमीचे रस्ते आणि त्यावर 20 हजारांहून अधिक खड्डे हे आजचे शहराचे चित्र आहे. खड्डय़ांतून वाट काढत आणि प्रचंड धुळीचा लोट नाका-तोंडात घेत लाखो औरंगाबादकरांना रोज ये-जा करावी लागत आहे. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने ‘रस्त्यांची दहशत’ ही मालिकाही चालवली होती, पण मनपाचे प्रशासन ढिम्म राहिल्याने नागरिकांचा त्रास काडीचाही कमी झालेला नाही. राजकीय पक्ष तुलनेने गप्प असले तरी नागरिक आता या विरोधात उभे राहिले आहेत. एक याचिका न्यायालयात आहे, तर विविध संघटना याबाबत आंदोलन करत आहेत.

धूळ हटवली, फुले अंथरली : सोमवारी इको नीड्स फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या संघटनेने महापौर बंगल्यासमोर हे आंदोलन केले. उपाध्यक्ष रोहित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी महापौर बंगल्यासमोरचा रस्ता झाडून फुले अंथरण्यात आली. ‘तुम्ही जा फुलांवरून, आम्ही जातो खड्डय़ांतून’,‘तुम्ही जा एसीतून, आम्ही जातो धुळीतून’ अशा घोषणा दिल्या.

आंदोलकांचे म्हणणे काय?
> खड्डे बुजवण्यात न आल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मुरूम व माती टाकून बुजवलेले खड्डे उघडे पडले आहे.
> धुळीमुळे नागरिकांना दमा, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, टीबी यांसारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
> खड्डय़ांमुळे नागरिकांमध्ये मानेचे, कमरेचे व मणक्यांचे आजार वाढत चालले असून परिस्थिती जीवघेणी बनत चालली आहे.
> गंभीर समस्यांबाबत महापौरांची संवेदना जागृत करावी या हेतूने आंदोलन केल्याचे उपाध्यक्ष रोहित थोरात यांनी सांगितले.

महापौर म्हणाल्या, माझ्या घरासमोर आंदोलन का करता ?
आंदोलकांनी नंतर महापौर कला ओझा यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, ‘माझ्या घरासमोर असे आंदोलन का करता? निवेदन द्यायला पाहिजे होते’. त्यावर कार्यकर्त्यांनी महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, आयुक्त सगळे उघड्या डोळ्यांनी शहराची स्थिती पाहत आहेत. माध्यमांमध्ये दररोज बातम्या येत असताना आणखी निवेदन कशाला द्यायचे, असे सांगत भूमिका सांगितली. महापौरांनी मात्र या आंदोलकांना कसलेही आश्वासन दिले नाही. आंदोलनात अँड. अत्तदीप आगळे, लक्ष्मण वाकळे, अतुल आठवले, सुनील खोतकर, प्रणव कुसणेवार, शिवाजी वाघमारे, अनिकेत चौबे, सचिन गेवराईकर, नईम शेख, सुरेश कांबळे, भाग्योदय घाटे सहभागी झाले.


आतापर्यंत झालेली आंदोलने
> 1 जुलै : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने चिश्तिया कॉलनीत खड्डय़ांचे पूजन करून आपला संताप व्यक्त केला होता.
> 30 जुलै : मनसेतर्फे एसएससी बोर्डासमोर उडी मारून खड्डे ओलांडण्याची स्पर्धा घेण्यात आली.
> 5 ऑगस्ट : मनसेतर्फे छावणीत खड्डय़ांत साचलेल्या पाण्यात होड्या सोडा आंदोलन करण्यात आले.
> 10 ऑगस्ट : मनसेतर्फे सिडको येथे खड्डय़ांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
> 3 सप्टेंबर : कल्पतरू युवा मंच या संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी मनपासमोर ठिय्या देत निदर्शने केली.