आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत रस्त्यांची दहशत: सत्ताधार्‍यांच्या साठमारीची नागरिकांना शिक्षा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सत्ताधार्‍यांच्या साठमारीत नागरिकांचे काहीही झाले तरी चालेल, रस्त्यांची वाट लागली तरी चालेल, आपले आपले राजकारण सुरू राहायला हवे, अशा भूमिकेतून मनपातील सत्ताधार्‍यांनी उस्मानपुरा चौक ते पीरबाजार हा वर्दळीचा रस्ता रोखून धरला आहे. रुंदीकरणाच्या मोहिमेत नागरिकांनी आपणहून घरे, दुकाने हटवली; पण रस्त्याचे नशीब उजळले नाही. खड्डय़ांचे साम्राज्य वाढतेच आहे.

उस्मानपुरा वॉर्डात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्रम पटेल सदस्य आहेत. त्यांनी स्थायी समितीत असताना पाठपुरावा करून रस्त्याचा विषय मांडला. हा आणि एसएससी बोर्ड ते पीरबाजार हे दोन रस्ते तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. दीड कोटी रुपयांचा खर्च येत असल्याने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात आला. स्थायी समिती सभापतिपदी विकास जैन असल्याने शिवसेनेतील खासदार खैरे यांच्या गटाने हे काम होऊ नये यासाठी खोडा घातला. विरोधी पक्षाच्या वॉर्डात दोन मोठी कामे कशासाठी, असे खुसपट काढत दोन्ही कामे सर्वसाधारण सभेने स्थगित ठेवली. विकास जैन विरुद्ध इतर अशा साठमारीत हे काम मागे पडले आहे. नगरसेवक पटेल म्हणाले की, या भागात शहरातील सर्वात सुरळीत रुंदीकरण मोहीम पार पडली. अतिशय वर्दळीचा हा भाग असल्याने येथील रस्ता चांगला होणे गरजेचे होते; पण विरोधी पक्षाच्या वॉर्डातील काम असल्याने र्शेय मिळणार नाही म्हणून त्यात खोडा घातला गेला. त्याचा फटका या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या हजारो नागरिकांना बसत आहे.
अतिशय अरुंद असणारा या भागातील रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे मोठा झाला. त्यानंतर लगेचच काम व्हायला हवे होते, ते न झाल्याने नागरिक आणि व्यापार्‍यांचे हाल होत आहेत. अनेक व्यापार्‍यांचा धंदा बसला आहे. खड्डे आणि खराब रस्ते यामुळे ग्राहक थांबायला तयार नाहीत, असे त्यांचे म्हणणे पडले.

या भागात रस्ता रुंदीकरण मोहीम झाली तेव्हा मी माझी बांधकामे आधी पाडली. त्यानंतर नागरिकांनीही संपूर्ण सहकार्य करून पाडापाडीला मदतच केली. अशा स्थितीत हा रस्ता तातडीने तयार करून देणे मनपाचे कर्तव्य होते; पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक असल्याने या कामात अडथळे आणले गेले. -अक्रम पटेल, नगरसेवक


दृष्टिक्षेपात रस्ता
वर्ष : 2001
कंत्राटदार : अजिंक्य कन्स्ट्रक्शन
नवा प्रस्ताव : संपूर्ण डांबरीकरण
लांबी : 700 मीटर
अंदाजपत्रक : 1 कोटी 50 लाख
सद्य:स्थिती : मंजुरी अडकली