आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादकरांच्या नशिबी खड्डेच; ठिगळपट्टीमुळे तीन कोटी पुन्हा मातीत जाण्याची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खड्डय़ांवरून प्रचंड ओरड होताच डांबरीकरणातून पॅचवर्कच्या कामांना सुरुवात झाली असली तरी इंडियन रोड काँग्रेसचे निकष डावलून ही कामे केली जात असल्याचे समोर आले आहे. खड्डे खोदून चौकोनी न करता केवळ पॅचचा आकारच चौकोनी ठेवण्याचाही प्रताप सुरू आहे. परिणामी या पॅचवर्कचे आयुष्य अत्यल्पच राहणार आहे. तीन कोटी रुपयांत शहरातील पॅचवर्क होणार असून याच पद्धतीने काम झाल्यास हे पैसेही मातीत जातील आणि नागरिकांच्या नशिबी पुन्हा खड्डेच राहणार आहेत.

शहरातील खड्डय़ांमुळे घायकुतीस आलेल्या नागरिकांत मनपाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. तो असंतोष ध्यानात घेऊन मनपाने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे.

गणेशोत्सवात फक्त विसर्जन मार्गापुरती राहिलेली ही मोहीम पावसामुळे बारगळली होती. आता पाऊस थांबताच हे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. बुधवारी क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंप आणि सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर चौक या रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले. मात्र आज दुपारी आलेल्या पावसाने हे काम मध्येच थांबवण्यात आले.

या दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले असले तरी दर्जेदार पॅचवर्क होत नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या निरीक्षणात उघड झाले आहे. पॅचवर्कचे काम इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार केले जाईल, असे ठासून सांगणार्‍या मनपाने प्रत्यक्षात हे काम तसे होत आहे का हे पाहिलेलेच नाही, असे स्पष्ट दिसत आहे. या मार्गांवरील खड्डय़ांचे पॅच चौकोनी करून भरण्यात आले असले तरी ते फक्त वरूनच दिसणारे चित्र आहे.

वरून चौकोन, खाली जैसे थे!
इंडियन रोड काँग्रेसने पॅचवर्क कसे असावे याचे निकष ठरवलेले आहेत. त्यानुसार खड्डा चौकोनी करावा व तो डांबराचा थर संपेपर्यंत खोदावा, मगच त्यावर डांबर व गिट्टीचा गरम थर द्यावा आणि नंतर रोलिंग करावे, असे नमूद केले आहे. सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर चौक मार्गावर प्रत्यक्षात खड्डय़ांतील धूळ साफ करण्यात आली. नंतर थेट खडी व डांबर टाकून फक्त त्या पॅचला चौकोनी आकार देत रोलिंग करण्यात आले. यामुळे खड्डा आता जरी भरला असला तरी या पॅचचे आयुष्य फार नसेल. याशिवाय हे पॅचवर्क करताना त्या शेजारी खड्डे मात्र भरण्यात आले नाहीत. किती दिवस तग धरणार ?
क्रांती चौकातील उड्डाणपूल संपताच चुन्नीलाल पेट्रोल पंपापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपर्यंत रस्त्याची निव्वळ चाळणी झाली होती. तेथील हे खड्डे बुजवताना पूल संपताच बँकेपर्यंत मोठे पॅच करून डांबर टाकण्यात आले आहे. या मार्गावरून जाणार्‍या वाहनांची संख्या आणि जड वाहनांची वर्दळ पाहता शास्त्रशुद्ध पद्धतीने न केलेले पॅच किती दिवस तग धरतील, याची शाश्वती नाही. या रस्त्याचे काम एम. एस. सिद्दिकी या कंत्राटदाराकडून सुरू आहे. सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर चौक या रस्त्यावरील कामात या पॅचचे रोलिंग कमी होत असल्याचे समोर आले असून, त्यामुळे येथेही चौकोनी दिसणार्‍या पॅचवर्कचे आयुष्य किती असेल याची शंकाच आहे.

पावसामुळे पुन्हा कामाला ब्रेक
दुपारी हे काम सुरू असताना दोन दिवस गायब असणारा पाऊस परतला आणि या कामाला पुन्हा ब्रेक लागला. ताज्या कामावर पावसाचे पाणी फिरल्याचेच दिसले. पाऊस येताच हे काम थांबले. या पॅचवरून पाणी वाहायला लागल्याने त्यांचे पुन्हा खड्डेच होणार आहेत. या संदर्भात उपअभियंता बी. डी. फड म्हणाले की, पाऊस थांबल्याने डांबरीकरण करून पॅचवर्क करण्याचे काम हाती घेण्यात आले. आता पुन्हा पाऊस नसताना काम करावे लागणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे.

नगरसेवक म्हणाले, उद्या पाहणी करतो : क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंप या मार्गाच्या कामाबाबत विचारणा केली असता नगरसेवक बबन नरवडे म्हणाले, आज काम सुरू झाले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे याकडे आपण लक्ष देणार आहोत. आयआरसीच्या निकषांनुसार ते काम झाले पाहिजे याचा आग्रह धरणार असून उद्या त्या कामाची पाहणी करणार आहे.