आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदारांचा निविदांवर बहिष्कार;महानगरपालिकेच्या रस्त्यांची कामे बारगळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रशर बंद केल्याने निर्माण झालेला कच्च्या मालाचा प्रश्न, रस्त्याच्या कार्योत्तर जबाबदारीच्या निर्धारणाच्या जाचक अटी, बिले देण्यास होत असलेला विलंब यामुळे औरंगाबाद हॉटमिक्स कंत्राटदार संघटनेने मनपासह सार्वजनिक बांधकाम आणि इतर विभागांच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मनपाची रस्त्यांची कामे बारगळण्याची शक्यता आहे तर जी कामे सुरू आहेत ती खडी आणि कच्चा माल पुरेसा नसल्यास रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.

संघटनेचे अध्यक्ष हरविंदरसिंग यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, रस्ते खराब झाले की कंत्राटदारांकडे बोट दाखवणार्‍या प्रशासनामुळेच आमच्यासमोर अनंत अडचणी उभ्या असून त्या सोडवण्यात आल्या नसल्याने निविदांवर बहिष्कार टाकण्याचे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. कंत्राटदारांकडून रॉयल्टी वसूल केल्यावरही जिल्हाधिकार्‍यांनी कंत्राटदारांची क्रशर्स सील केली आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे करणे अवघड बनले आहे. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे कच्च्या मालाचा वेळेत पुरवठा झाला नाही तर बंद होऊ शकतात, असा इशाराही सिंग यांनी दिला.

बिलांचा प्रश्न महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकामसह इतर विभागांतही असल्याने कंत्राटदार हवालदिल झाल्याचे सांगून सिंग म्हणाले की, बिले देताना ती दरमहा, दर आठवड्याला देण्याची काही तरी व्यवस्था केली पाहिजे. तसे झाल्यास आम्ही दोन महिन्यांचे काम एका महिन्यातही करून देऊ शकतो, पण कोठेही तसे होत नाही. उलट बिलांसाठी कंत्राटदारांना त्रासच सहन करावा लागत आहे.

रस्त्याच्या कार्योत्तर जबाबदारीचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगून ते म्हणाले की, शासनाच्या जीआरमध्ये या जबाबदारीचा उल्लेख नाही, पण प्रत्यक्षात तीन आणि पाच वर्षांची जबाबदारी असते. ती जाचक असल्याचे ते म्हणाले.

रस्त्यांचे डिझाइन बदलायला हवे
शहरातील खराब रस्त्यांबाबत सिंग म्हणाले की, मनपाच्या 1450 किमीच्या रस्त्यांपैकी 360 किमीच्या रस्त्यांचे दर तीन वर्षानी नूतनीकरण व्हायला हवे. त्यासाठी किमान 200 कोटी रुपये खर्च येतो, पण मनपाकडे 25-30 कोटीच असतात. पॅचवर्कवर दोन ते तीन कोटी रुपये खर्च केला जातो.

रस्त्यांचे डिझाइन नव्याने करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, रस्त्याची मजबुती वाढवायला हवी. कारण वाहनांची संख्या, अवजड वाहनांचे प्रमाण वाढत आहे आणि रस्ते मात्र जुन्याच निकषाप्रमाणे केले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होतात. पेव्हर ब्लॉकमुळे शहरातील रस्त्यांची नासाडी झाली असून बहुतेक भागात ते रस्त्यापेक्षा उंच आहेत. परिणामी पाणी रस्त्यावर साचते व ते लवकर खराब होतात.

या पत्रकार परिषदेला हरविंदरसिंग यांच्याशिवाय संघटनेचे उपाध्यक्ष ख्वाजा अमिनोद्दीन, ए. एस. वाकडे पाटील, अझीम सिद्दिकी, रमजान चारमिया यांची उपस्थिती होती.