आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील पाच रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी 21 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील 20 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी 21 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (नऊ ऑक्टोबर) मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला. तसेच या कामाच्या ई-टेंडरिंगची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करून एका महिन्याच्या आत काम सुरू करावे, असे आदेश दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

शहरवासीयांमध्ये रस्त्याच्या प्रश्नावरून असंतोष व आक्रोश आहे. या लोकभावना बांधकाम मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या होत्या व पाठपुरावा सुरू होता. या प्रश्नाची दखल घेऊन बांधकाम मंत्र्यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेतला. या वेळी माझ्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती, असेही दर्डा यांनी सांगितले. ते म्हणाले, रस्त्यांच्या नूतनीकरणाच्या कामात निधीची कुठलीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही भुजबळांनीही दिली आहे. त्याच वेळी खात्याच्या अधिकार्‍यांना कुठलीही सबब न सांगता जलदगतीने काम करण्याचे आदेश दिल्याचे दर्डा म्हणाले. हे रस्ते अगदी उत्तम, दज्रेदार आणि सर्टिफाइड असावेत, अशी सूचना भुजबळांना केल्याचेही ते म्हणाले.