आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या वाट्याला केवळ तीन रस्ते!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 30 कोटी रुपयांत तातडीने करावयाच्या रस्त्यांच्या यादीत भाजप नगरसेवकांच्या वॉर्डांना डावलण्यात आल्याने मनपात मोठे रणकंदन माजले असून भाजपने आम्हाला ही यादी बिलकूल मान्य नाही, असे सांगत शिवसेनेच्या दादागिरीला आव्हान दिले आहे. कोणते रस्ते यादीत घ्यायचे यावरून सुरू असलेला संघर्ष आता टिपेला पोहोचला असून यादीवरून दोन्ही सत्ताधारी पक्ष आमनेसामने उभे राहिले आहेत.

मागील पंधरा दिवसांपासून रस्त्यांच्या यादीवर एकमत होत नसल्याने हे काम रेंगाळत पडले आहे. यादीतील रस्ते कोणते हे सांगण्यास दोन्ही पक्षांचे पदाधिकारी अपयशी ठरले. महापौरांनी तर यादी फायनल झाली आहे, लवकरच सांगू, असे सांगत वेळ मारून नेली, तर भाजपच्या एकाही पदाधिकार्‍याला यादी पाहायला मिळाली नसल्याचे उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले. अखेर आज 17 रस्त्यांची ही यादी हाती लागली. तिन्ही कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंत्यांच्या सहीने तयार करण्यात आलेल्या या यादीत मनपातील सत्तासंघर्षाचे चित्रच समोर आले आहे. शिवसेनेने नेहमीप्रमाणे भाजपवर कुरघोडी केली आहे.

..दादागिरी अशी!
या 17 रस्त्यांच्या यादीत भाजप नगरसेवकांना पद्धतशीर डावलण्यात आले असून त्यांच्या अवघ्या तीन नगरसेवकांच्या वॉर्डांतील रस्त्यांचा यात समावेश आहे. सभापती नारायण कुचे, महेश माळवतकर आणि अनिल मकरिये यांची या यादीत लॉटरी लागली आहे. बाकी सगळे रस्ते शिवसेनेच्या वॉर्डातील आणि मित्रांच्या वॉर्डांतील आहेत. खुद्द महापौर कला ओझा यांनी या 30 कोटींच्या कामांपैकी दोन कोटींची कामे आपल्या वॉर्डांत हक्काने ओढून घेतली आहेत. उपमहापौर संजय जोशी यांनी सहकारनगर ते उल्कानगरी मार्गे रिद्धी- सिद्धी हॉलची मागील बाजू हा रस्ता या यादीत घ्यावा यासाठी जंग जंग पछाडले, पण त्यांना महापौरांनी दाद दिली नाही. उपमहापौरांची ही स्थिती, तर इतर नगरसेवकांच्या कामाची बातच सोडा.

भाजप नगरसेवकांत संताप
भाजपचे गटनेते संजय केणेकर प्रचंड संतापले असून ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी मिळून भाजपच्या वॉर्डातील रस्ते बाजूला ठेवले, असा आरोप करीत ते म्हणाले, शिवसेनेने आपल्या पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघापुरताच विचार केला. पूर्व मतदारसंघ भाजपकडे असल्याने तो डावलण्यात आल्याचा आरोप केला. आता खूप झाले, हे खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. सुशील खेडकर यांनी हा आरोप खोडून काढला असून रस्ते चांगले करण्याची जबाबदारी आमची आहे, मग ते कोणाच्याही वॉर्डातील असोत, त्याचा आम्ही विचार केलेला नाही.